नवी दिल्ली: २० ट्वेंटी मालिकेत बरोबरी करणाऱ्या टीम इंडियाच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वरच्या स्थानावर फलंदाजीस उतरवणे आवश्यक असल्याचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघावर पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलीच तर संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याची गरज असल्याचे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. कर्णधार कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीत बदल करायला हवेत. सुरेश रैनाऐवजी मनिष पांडे याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यास काहीच हरकत नाही. रैनाने सहाव्या स्थानावर फलंदाजी करायला हवी, असे गांगुली म्हणाला.
नेहरा आणि बुमराह यांना विजयाचे श्रेय
धोनी वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी आला तर तो चांगली कामगिरी करू शकतो, पण यावर संघ व्यवस्थापनाने अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे, असेही तो पुढे म्हणाला.
भारतीय संघाने नागपूर ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला. भारतीय संघाचे गोलंदाज आशिष नेहरा आणि जसप्रित बुमराह यांना नागपूरमधील विजयाचे श्रेय दिले गेले. दोघांनी अखेरच्या षटकांमध्ये अप्रतीम गोलंदाजी करून इंग्लंडच्या धावसंख्येला लगाम घातला. बुमराहने टाकलेल्या अखेरच्या षटकामध्ये इंग्लंडला केवळ दोन धावा करता आल्या आणि भारतीय संघाने सामना जिंकला.
बंगळुरूचा सामना निर्णायक
भारतीय संघाने नागपूरमधील विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे बंगळुरू येथे बुधवारी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला दीडशेचाही आकडा गाठता आलेला नाही. धोनीला वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविणे गरजचे आपण गेल्या चार ते पाच वर्षांपासून सांगत असल्याचेही गांगुली यावेळी म्हणाला. धोनी वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी आला तर तो चांगली कामगिरी करू शकतो, पण यावर संघ व्यवस्थापनाने अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे, असेही तो पुढे म्हणाला.
धोनी उत्तम फिनिशर
ट्वेन्टी-२० मध्ये धोनी उत्तम फिनिशर असल्याचे सांगितले जात असले तरी ट्वेन्टी-२० विश्वात धोनीने अद्याप एकही अर्धशतक ठोकलेले नाही. कुवत असतानाही त्याला खेळपट्टीवर जास्तवेळ फलंदाजीची संधीच मिळत नाही. धोनीने आजवर ७५ हून अधिक ट्वेन्टी-२० सामने खेळले असतानाही त्यात एकही अर्धशतक नाही. धोनी चांगला फिनिशर असल्याने त्याला नेहमी सहाव्या स्थानावर फटकेबाजीसाठी पाठविण्यात आले. धोनीने आपली योग्यता सिद्ध करून भारतीय संघासाठी अनेक सामने देखील जिंकून दिले. पण धोनीला वारंवार खालच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने मोठी खेळी साकारण्याची क्षमता असतानाही त्याला मर्यादित षटकांमुळे माघार घ्यावी लागते.