वरणगांवसह परिसरात विज चोरीच्या विरोधात धडक मोहीम

0

वरणगांव। मार्च महिना अखेर राबविण्यात आलेल्या विजबिल वसुली नंतर आता विज चोरी विरोधात धडक मोहीम विज वितरण विभागाने हाती घेतली आहे. जळगांव महावितरण परीमंडळाच्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता जे.एस. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अभियंते व बारा कर्मचारी असे सतरा सदस्यांचे विज चोरी शोधपथक तयार करण्यात आले असुन त्यांचे कडून धडक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

कार्यवाहीचे दिले आदेश
महावितरण जळगांव परीमंडळ प्रशासनाच्या आदेशानुसार विज चोरीमुळे महसुलामध्ये जिल्हाभरात 20 ते 22 टक्यांपेक्षा अधिक नुकसान होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात विज चोरी रोखण्याकरीता शोध पथक तयार करुन कार्यवाहीचे आदेश जिल्हा स्तरावरुन देण्यात आले आहे.

पथकात यांचा आहे समावेश
त्याच अनुशंगाने वरणगांवातील उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली बी.व्ही. सिंग, वरणगांवचे सहाय्यक अभियंता ए.जे. लढे, सहाय्यक अभियंता ग्रामीण दोन, तळवेल सहाय्यक अभियंता एस.पी. कुमरे, व्ही.एस. रुले, कनिष्ठ अभियंता ग्रामीण एक, आचेगांव कनिष्ठ अभियंता एस.व्ही. गुळवे या पाच अभियंत्यांसोबत एस.झेड. धनगर, एम.सी.पाटील, टी.सी. पाटील, डी.पी. भिरूड, एस.पी. पाटील, सी.जी. महाजन, एन.आर. बेंडाळे, एन.एस. बावीस्कर, अरुण इंगळे, अमिर खान, मयुर धांडे, महेंद्रसिंग रावळ असे बारा कर्मचारी मिळून सतरा सदस्सीय पथक तयार करण्यात आले आहे.

फौजदारी गुन्हा होणार
पथकातील अधिकार्‍यांच्या चौकशी अंती दोषी आढळून आल्यास कार्यवाही कारण्यात येणार आहे. विजचोरी करतांना आढळून आल्यास व कार्यवाही संबधी अडथळा निर्माण केल्यास किवा दंडास पात्र असुन दंड न भरल्यास अशा व्यक्तींवर अजामिन पात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता व्हि.बी. सिंग यांनी सांगितले. पथकाची कार्यवाही वरणगांवसह फुलगांव, अंजनसोंडे, तपतकठोरा बु, खु, हतनूर, टाहाकळी, आचेगांव, सुसरी, पिंपळगांव खु , बु , गोडेगांव, भानखेडा, धानोरी, करंजी पाच देवळी, बोहर्डा -बोहर्डी, जाडगांव, मनारखेडा, तळवेल, जुनोना, बेलखेडा आदी गावांमध्ये पथक प्रत्येक घराघराची पाहणी करुन दोषी आढळल्यास कार्यवाही करणार आणि कारवाई टाळण्यासाठी मिटरचे अधिकृत कनेक्शन घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात येणार आहे. अनधिकृत शेतीपंप वापराचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.