वरणगांवातील युवकांची चांगदेव ते वरणगांव कावड यात्रा

कावडधारी शिव भक्तांच्या खांद्यावरील शिवपिंडीने वेधले भाविकांचे लक्ष 

वरणगांव : प्रतिनिधी

शहरातील युवकांनी अखेरच्या श्रावणी सोमवारी श्रीक्षेत्र चांगदेव ते श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर वरणगांव पर्यंत कावड यात्रा काढली. कावड यात्रेतील बारा युवकांनी आपल्या खांद्यावर घेतलेले शिवलींग भाविकांचे आकर्षण ठरले होते .

 

वरणगांवातील मरिमाता मित्र मंडळ व बजरंग दलाच्या युवकांनी अखेरच्या श्रावण सोमवारी तापी – पूर्णा नदीच्या संगमावरील श्री क्षेत्र चांगदेव येथील पवित्र जल घेवुन श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर वरणगांव अशी कावड यात्रा काढली . हि कावड यात्रा श्रीक्षेत्र चांगदेव, मेहुण, मानपूर, टहाकळी व फॅक्टरी मार्गे वरणगांव शहरात आली . यावेळी कावड यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच कावडधारी बारा युवकांनी आकर्षक पद्धतीने आपल्या खांद्यावर घेतलेले एक मोठे शिवलींग भाविकांचे आकर्षण ठरले होते . शहरातुन वाजत गाजत कावडधारी युवा भक्तांनी श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरातील शिवलींगाचा जलाभिषेक केला. तर या कावड यात्रेत भरत चंदने, सोनु चंदने, चेतन कुंभार, तुषार कुंभार, प्रमोद परदेशी, मुकेश चंदने यांचेसह शिव भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता . तर यंदा प्रथमच श्रावण सोमवार निमित्त वरणगांव व परिसरातील शिव भक्त युवकांनी श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे कावड यात्रा काढून मंदिरातील शिवलींगाचा जलाभिषेक केला आहे .

*मंदिराला यात्रेचे स्वरूप*

वरणगांव व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोदवड मार्गावरील श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते . तसेच मंदिर परिसरात खेळण्याच्या साहित्याची दुकाने,आकाश झुला असे विविध प्रकारचे मनोरंजन व खाद्य पदार्थांची दुकाने लावली जात असल्याने दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत असून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते . यात्रेप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला जातो .