वरणगांव व फुलगांवात चोरट्यांनी दहा घरांना केले लक्ष्य
( घरमालक गावी गेल्याची संधी आणि पावसाची रिपरिप चोरट्यांच्या पथ्यावर - घटनांमुळे उडाली खळबळ )
वरणगांव । प्रतिनिधी
घरमालक बाहेर गावी गेल्याची संधी व महीनाभराच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसाची रिपरिप मध्यरात्री चोरट्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री वरणगांव शहर व फुलगाव मधील बंद दहा घरांना लक्ष्य करीत हाती लागेल तो मुद्देमाल व रोख रक्कम घेवुन पोबारा केला. हि घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरणगांव शहराच्या रेणूका नगर भागातील उत्तम देशमुख, अक्षय सोमा बोदडे, विवेक पाटील (यांचे घरातील भाडेकरू श्री .नागरे ), सुभाष तोताराम पाटील हे बाहेर गावी गेले आहेत . यामुळे चोरट्यांनी शुक्रवारी दिवसा रेकी करून व महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर सुरु झालेल्या पावसाच्या रिपरिपची मध्यरात्री संधी साधून या बंद घरांना लक्ष्य करीत दरवाज्यांची कुलूपे तोडून घरातील काही मुद्देमाल व रोख रक्कम घेवून पोबारा केला. तर याच प्रकारे शहराच्या नजिकच्याच फुलगांवातही चोरट्यांनी गंगाधर शिवाजी पाटील हे औषधोपचारासाठी महीनाभरा पासुन पूणे येथील आपल्या मुलाकडे गेले आहेत . याच प्रमाणे गावाच्या विविध भागातील पुष्पाबाई पंडीत पाटील, पवन मधूकर पाटील, गोपाळ जगन्नाथ कदम, हेमंत सुभाष चौधरी असे बाहेर गावी गेल्याचीही संधी चोरट्यांनी साधली. यावेळी चोरट्यांनी बंद घराचे कुलूपे तोडण्यापूर्वी शेजारील रहीवाशांच्या घराला बाहेरून कडी – कोयंडा लावुन घेतले होते . हि घटना सकाळी लक्षात येताच वरणगांव शहर व फुलगावांत खळबळ उडाली असून पावसाची रिपरिप मध्यरात्री चोरट्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली असल्याची चर्चा रंगली आहे . मात्र, या घटनांमध्ये कुणाच्या घरातून नेमका किती मुद्देमाल व रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली याचा उलगडा घरमालक घरी आल्यावरच होणार आहे .
*चोरट्यांनी दुचाकीही केली होती लंपास*
फुलगांव येथील भिलवाडी समोर रहीवाशी असलेले हेमंत चौधरी हे कालच ( शुक्रवारी ) सांयकाळी मुंबई येथील आपल्या भावाच्या घरी काही कार्यक्रमासाठी गेले असून चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट व दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. व घरातील काही रक्कमेसह मुद्देमाल लंपास केला .तसेच जाताना त्यांची दुचाकीही घेवून गेले मात्र, या दुचाकीची सोशल मीडियावर चर्चा होताच चोरट्यांनी पळवून नेलेली दुचाकी भुसावळ रोडवरील हिरा मारोती मंदिर लगतच्या शेताजवळ आढळून आल्याचे हेमंत चौधरी यांच्या गावातील शालकाने सांगीतले .
*कुलुपे तोडण्यासाठी हेक्सा ब्लेडचा वापर ?*
वरणगांव शहर व फुलगावातील काही घरांचे कुलुपे तोडण्यासाठी हेक्सा ब्लेडचा वापर केला असल्याचे घटनास्थळावर दिसुन येत आहे . तर काही कुलुपांना तोडण्यासाठी धारदार किंवा लोखंडी टॉमीच्या साहित्याचा वापर केल्याचे दिसत आहे . तर या घटने पाठोपाठ श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर लगत असलेल्या साडेतीन शक्तीपीठ मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आल्याचे समोर आले . मात्र, या दानपेटीत किरकोळ रक्कम होती असे सांगण्यात येत असुन या सर्व घटनां संदर्भात बाहेर गावी गेलेले घरमालक रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आले नव्हते . यामुळे घटनेतील मुद्देमाल व रक्कमे संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती . मात्र, या घटनेची सकाळी पोलीसांना माहिती मिळताच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता त्यांना चोरट्यांनी बहुतांश घरातील सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसुन आले .यामुळे त्यांनी चोरट्यांचा मागमुस काढण्यास सुरुवात केली आहे .