रस्ते व विविध विकास कामांना भरीव निधी देणार -देवेंद्र फडणवीस
वरणगाव:- वरणगाव शहराच्या विकासकामांसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आमदार संजय सावकारे, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. याप्रसंगी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विविध विकासकामांचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
या कामांसाठी निधीची मागणी
वरणगाव शहरातील रस्ते व गटारींसाठी 10 कोटी, कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन कोटी 66 लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून तो मंजूर करावा तसेच नागेश्वर महादेव मंदिराचा पर्यटन विकासच्या माध्यमातून चार कोटी 96 लाख रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला. त्याला मंजुरी द्यावी तसेच वरणगाव शहरात व्यापारी संकुलासाठी 15 कोटींचा निधी द्यावा, भोगावती नदी पुनर्जीवनासाठी 12 कोटींचा प्रस्ताव सादर केला असून त्यास मंजुरी द्यावी, विशेष रस्ता अनुदान 10 कोटी योजनेतून रस्ते पेव्हर ब्लॉक रस्त्यांसाठी 10 कोटींचा निधी दयावा, नगरपालिका इमारतीसाठी 10 कोटी देण्यात यावे, वरणगाव शहर हे 50 हजार लोकसंख्येचे शहर असून त्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना व संपूर्ण शहरात भूमिगत गटारींसाठी भरीव निधी देण्यात यावा, वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी 10 कोटी, नगरपालिका इमारतीसाठी पाच कोटी अशी मागणी करण्यात आली.
भाजपची सत्ता असल्याने निधी द्यावा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांंना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, वरणगाव नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने भरीव निधी देण्याची आवश्यकता आहे. महाजन यांनीदेखील या संदर्भात् फडणवीस यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले. काळजी करू नका, जनतेची विकासाची कामे करा, मी तुमच्यासोबत आहे, लवकरच सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासनही देण्यात आले.