वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या जागेची महानिरीक्षकांकडून पाहणी

0

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे सुरुवातीला पोलिस प्रशिक्षण केंद्र म्हणून मंजूर झालेल्या मात्र नंतर राज्य राखीव दल (एसआरपीएफ) साठी प्रशिक्षण केंद्र म्हणून मंजूर झालेल्या वरणगाव शिवारातील नियोजित जागेची नाशिक परीक्षेत्राचे महानिरीक्षकछेेरींग दोर्जे यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले तसेच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांची उपस्थिती होती.

जागेची पाहणी, कर्मचार्‍यांना केल्या सूचना
वरणगाव शिवारात राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र मंजूर असून या जागेची शनिवारी सायंकाळी दोर्जे यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी प्रशिक्षण केंद्रापासून शाळा, कॉलेजजवळ किती अंतरावर आहेत तसेच पाण्याची नेमकी व्यवस्था किती, ऑर्डनन्स तसेच राज्य शासनाची नेमकी जागा किती याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.उगले यांच्याकडून माहिती जाणून घेतली. वरणगाव पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याच्या कामकाजाची तसेच ईमारतीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांना तपासाबाबत सूचना केल्या. याप्रसंगी वरणगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे उपस्थित होत्या.

वरणगावातील खूनाचा गुन्हा एलसीबीकडे देण्याचे आदेश
वरणगावातील रहिवासी सुनील ओंकार चौधरी यांचा सहा महिन्यांपूर्वी खून झाल्यानंतरही मारेकरी न सापडल्याने मयताची पत्नी सरीता चौधरी यांनी दोर्जे यांची शनिवारी भेट घेतली. सहा महिन्यांपासून पोलिसांना मारेकरी पकडण्यात यश आले नसल्याची त्यांनी खंत व्यक्त करीत खुनाचा जलदगतीने उलगडा करण्याची विनंती केली. याप्रसंगी दोर्जे यांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेशही दोर्जे यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्याचे समजते.