नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती ; मंत्री महाजनांसह आमदार सावकारेंचे मानले आभार
वरणगाव:- नगपरीषदेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी 66 लाखांच्या निधीला मंजुरी दिली असून या प्रकल्पामुळे वरणगाव शहरातील कचर्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यास मोठी मदत होणार आहे. हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार संजय सावकारे यांनी विशेष पाठपुरावा केल्याने त्यांचे आपण आभारी असल्याचे काळे यांनी कळवले आहे.
नेत्यांच्या पाठपुराव्याला यश
वरणगावात हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे उभय नेत्यांनी पाठपुरावा केला होता तर या नेत्यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रस्ताव 15 मार्च रोजी सादर केला होता. या बैठकीला उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ उपस्थित होते. मंजूर निधीतून गट नंबर 668 मध्ये कचरा प्रकल्प उभा राहणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत वरणगाव हे जिल्ह्यात अग्र क्रमांकावर आहे. ओला कचरा, सुका कचर्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मशनरी, प्रकल्पस्थळी रस्ते व जनजागृतीसाठी तरतूद करण्यात आली आहे. कचरा संकलनासाठी शहरात लवकरच वाहनांची खरेदी केली जाणार असल्याचेही काळे म्हणाले.
लोकप्रतिनिधींचे मानले आभार
वरणगाव नगरपरीषदेत घन कचरा प्रकल्प मंजूर करण्यासाठी विशेष पाठपुरावा करणार्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे विशेष आभार नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य सभापती नसरीनबी साजीद कुरेशी, नगरसेविका मेहनाजबी पिंजारी, माला मेढे, शशी कोलते, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी, विष्णू खोले आदींनी मानले आहेत.