वरणगावातील भोगावती नदीच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

माजी मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

वरणगाव : वरणगाव शहरातील भोगावती नदी सुशोभीकरणाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागल्याने वरणगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भोगावती नदीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी भाजपाने वारंवार आंदोलने उभी केली होती. याबाबत माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्याकडे सोमवारी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मंत्रालय मान्यतेच्या पत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरल्यानंतर बुधवार, 6 रोजी माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांनी नगरविकास विभागात जाऊन उपप्रधान सचिव पो.जो.जाधव यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर पत्र जारी करण्यात आले. दरम्यान, भोगावती नदी सुशोभीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने लवकरच निविदा प्रक्रिया होवून कामांना सुरूवात होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

अडीच कोटींच्या कामाबाबत निविदा निघणार
वरणगाव शहरातील भोगावती नदी सुशोभीरणाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता लवकरच अडीच कोटी रुपये खर्चातून दोघा बाजूने संरक्षण भिंत व घाट बांधले येतील त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असा विश्‍वास माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वर्तवला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नगरसेविका माला मेढे, मेहनाज पिंजारी उपस्थित होते.