वरणगावातील भोगावती नदी खोलीकरणासाठी 13 रोजी उपोषण

0

प्रशासनाने घेतली नगराध्यक्षांच्या उपोषण इशार्‍याची दखल

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरातील भोगावती नदीच्या खोलीकरणाचे काम तत्काळ मार्गी लागण्यासाठी नगरपरीषदेने ठराव करून खोलीकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करून केला होता शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्या माध्यमातूनही प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने काम करून देण्याचे आदेश दिले होते तर महामार्ग चौपदरीकरणाची जवाबदारी असलेल्या नही प्राधिकरणाने नदीचे अर्धे खोलीकरण सुद्धा केले मात्र शहरात खोलीकरणाचे काम आल्यावर काही विघ्नसंतोषींनी या कामात खोडा घातल्याने हे काम बंद पडले होते. हे काम पूर्ववत सुरू होण्यासाठी आता नगराध्यक्षांनीच 13 रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.

उपोषण टाळण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न
वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी यांना स्वतःसह उपनगराध्यक्ष शेख अखलाक तसेच नगरसेवकांना सोबत घेवून 13 मे रोजी भोगावती नदीपात्रातच उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनाच्या गोटात खळबळ उडाली आहे. नही कंपनीने पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सोबत घेवून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेदेखील नगराध्यक्ष सुनील काळे यांनी धाव घेत निवेदन दिले आहे. महाजन यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना दूरध्वनी करून भोगावती नदी खोलीकरणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचा सुचना केल्या असून उपजिल्हाधिकारी गोरक्ष खाडीलकर यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी बबन तडवी यांना पोलिस प्रशासन हाती घेवून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याने उपोषण होते वा नाही? याकडे लक्ष लागले आहे.