प्रांताधिकार्यांनी दिले आश्वासन ; नगराध्यक्ष सुनील काळेंसह नगरसेवकांचा होत उपोषणात सहभाग
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरातील भोगावती नदी पात्राचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी नगरपालिका पदाधिकार्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह जिल्हाधिकार्यांना साकडे घातले होते. जिल्हाधिकार्यांनी कामाचे आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होवून अर्धे खोलीकरण होवून काम बंद करण्यात आले. हे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळेंसह पदाधिकार्यांनी उपोषण छेडण्याचा इशारा दिल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने पदाधिकार्यांनी सोमवार, 13 पासून उपोषण छेडले होते. दरम्यान, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी 15 मे नंतर कामास प्रारंभ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकार्यांनी दुपारी उपोषण मागे घेतले.
यांचा उपोषणात सहभाग
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी संजय कोलते यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते अल्लउद्दीन सेठ, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, माजी उपसरपंच शेख सईद, समाजसेवक ईरफानभाई पिंजारी, साजीद भाई कुरेशी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे, संजयकुमार जैन, शामराव धनगर, भाजपा शहर प्रमुख सुनील माळी, ईरफान सेठ, डी.के.खाटीक, शेख सिराज, आकाश निमकर, लखन माळी, मनोहर सराफ, डॉ.इद्रिस यांच्यासह वरणगाव शहरातील असंख्य नागरीक उपोषणात सहभागी झाले आहेत. जि.प.सदस्य पल्लवी सावकारे व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठिंबा दर्शवला.
प्रांताधिकार्यांनी आश्वासन ; उपोषणाची सांगता
प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून 15 नंतर लागलीच कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी, महसूल विभागाच्या सर्कल वैशाली पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे या शासन प्रतिनिधींनी उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषण सोडवण्यात आले. दरम्यान, 15 मे नंतर लागलीच भोगावती नदीच्या खोलीकरण कामाला सुरुवात न झाल्यास 17 मे नंतर भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडू, असा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे.