स्थायी समितीची बैठक : खड्डेमय रस्त्यातून शहरवासीयांना मिळणार मुक्ती
वरणगाव- वरणगाव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्ते कामांसाठी एक कोटी 70 लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच शहरातील रस्ते कात टाकणार असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेचा क्रमांक आल्यानंतर शहरातील प्रमुख डॉक्टर, पत्रकार, मुख्याध्यापक, हॉटेल मालक आरोग्य दूतांचा गौरव करण्याचे ठरले तसेच राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यांची होती उपस्थिती
सभेस उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, आरोग्य सभापती नसरीनबी साजीद कुरेशी, महिला बालकल्याण सभापती माला मेढे, बांधकाम सभापती शशी कोलते उपस्थित होत्या. लिपिक अनिल तायडे यांनी विषयाचे वाचन केले.
या कामांना मिळाली मंजुरी
शहरात एक कोटी 70 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यात वॉर्ड क्रमांक दहामधील जगदंबा नगरातील इंगळे यांच्या चक्कीपासून एमएसईबी कार्यालयापर्यंत काँक्रिटीकरण रस्ता, तसेच वॉर्ड क्रमांक 15 मधील गंगाराम धनगर ते मशिदपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण, वॉड क्रमांक नऊ व 11 मधील रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच प्रभाग नऊ मधील रस्त्याचे काँक्रिटीकरण कामे होणार आहेत.