वरणगावातील विकासकामांसाठी पावणेदोन कोटींचा निधी मंजूर

खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाना यश ः विविध कामे होणार

भुसावळ : वरणगाव शहरातील विविध विकासकामांसाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी पावणेदोन कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधी मिळण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन यांच्याकडे 31 जुलै 2022 रोजी वरणगाव शहरातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी लेखी स्वरूपात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली होती.

या कामांना मिळाली मंजुरी
महात्मा फुले नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले मंगल कार्यालयापर्यंत सत्तर लाख रुपयाचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, झांबरे यांच्या घरापासून ते महात्मा जोतिबा फुले सामाजिक सभागृहपर्यंत गटारी तयार करणे, गट नंबर 803 मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे सामाजिक सभागृहाची उभारणी, जगदंबा नगर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पुलाची उभारणी,तजालंदर नगर येथे ओपन स्पेसमध्ये ओपन जिमसह खेळणी वाकिंगसाठी ट्रॅक बांधणे, महालक्ष्मी नगरात रस्ता तयार करणे, सिध्देश्वर नगरात भिल वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याला यश
वरणगाव शहरात विकासकामे करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणीचा प्रस्ताव दिला होता व त्यास मंजुरी मिळून वरणगाव शहरासाठी पावणेदोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. भाजपा खासदार रक्षा खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नगरसेविका माला मेढे, मेहनाज पिंजारी, आकाश निमकर, भाजयुमो अध्यक्ष प्रणिता पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा डी.के.खाटीक यांनी आभार मानले आहेत.