वरणगावातील सेंट्रल बँकेचा कारभार केवळ तीन कर्मचार्‍यांवर

0

खातेदार त्रस्त : राजकीय व सामाजिक संघटनांचे उदासीन धोरण

भुसावळ- वरणगाव व शहर परीसरात एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँकेची शाखा असून या शाखेत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह अनेक खातेदारांचे खाते आहे मात्र बँकेच्या या शाखेत तिनच कर्मचारी असल्याने खातेदारांना अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे मात्र या प्रकाराकडे शहरातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने बँकेतील मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचारी व इतर खातेदार नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वरणगाव शहर व परीसरातील नागरीक तसेच आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी अशा बहूतांश नागरीकांचे राष्ट्रीयकृत असलेल्या सेंट्रल बँकेत खाते आहे. यामुळे या शाखेत दिवसभर खातेदारांची गर्दी असते मात्र बँकेतील कर्मचार्‍यांवर वरीष्ठ अधिकार्‍यांचा वचक नसल्याने तसेच कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने वयोवृद्ध खातेदार व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचार्‍यांना तास न् तास रांगेत उभे रहावे लागते. खातेदार आणि कर्मचार्‍यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत.

एटीएम झाले एटीएनएम
बँकेच्या माध्यमातून खातेदारांना 24 तास रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी अ‍ॅनी टाईम मनी (एटीएम ) सुरू केले आहे मात्र या एटीएम मध्ये सहा हिन्यापासून रक्कम उपलब्ध होत नसल्याने खातेदारांना बँकेत रांगा लावून आवश्यक रक्कम काढावी लागत आहे. यामुळे एटीएमची अवस्था अ‍ॅनी टाईम नो मनी ( एटीएनएम) अशी झाली आहे. यामुळे अनेकांना वरणगाव फॅक्टरीतील स्टेट बँक, आयडीबीआय अथवा वरणगावातील खासगी एटीएमचा आधार घ्यावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

प्रिंटरही असते बंदावस्थेत
बँकेत पासबुकावरील रकमेची नोंदणी करण्यासाठी असलेले प्रिंटर गत सहा महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. यामुळे खातेदारांना आपल्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळत नसल्याने खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. याबाबत खातेदारांनी बँकेतील कर्मचार्‍यांशी विचारणा केली असता त्यांना मोघम उत्तरे दिली जातात.

बँक व्यवस्थापकांचाही मनमानी कारभार
बँकेत कायमस्वरूपी व्यवस्थापक असणे गरजेचे आहे मात्र बँकेतील व्यवस्थापक केवळ मोजक्याच दिवशी हजेरी लावत असल्याने कर्मचार्‍यांचीही डोकदुखी वाढली आहे. यामध्ये मुद्रा लोनसह इतर विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी खातेदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी वरीष्ठ अधिकार्‍यांनी नगरपालिका असलेल्या या शहरातील सेंट्रल बँकेच्या शाखेकडे काळजीपुर्वक लक्ष देवून खातेदार व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे.

राजकीय उदासीनता कारणीभूत
वरणगाव शहराला वरणगाव आयुध निर्माणीसह परीसरातील 27 खेड्यांचा संपर्क येतो. यामुळे या गावात स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांची आवश्यकता आहे मात्र राजकीय व सामाजिक उदासीन धोरणांमूळे शहरात केवळ सेंट्रल बँकेची एकमेव शाखा आहे. या शाखेचाही व्यवस्थित कारभार नसल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मरगळ झटकून इतर राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.