वरणगाव । शहरातील एक्स्प्रेस फिडरच्या प्रत्यक्ष कामास शुक्रवारपासून सुरुवात झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 52 लाखांचा निधी मंजूर झाला होता मात्र हे काम बंद पडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे काम सुरू करण्याची मागणी केली होती. यावेळी बैठकीत तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते .
सहकार्याअभावी ठेकेदाराने काढला होता पाय
वरणगाव शहराचा वाढता विस्तार बघता साडे आठ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तापी नदी काठावरील कठोरा येथे पंपिंग हाऊस तर सिद्धेश्वर नगरात शुध्दीकरण केंद्र तयार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी भारनियमन होत असल्याने पुरेश्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नव्हता यासाठी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले होते. कामदेखील सुरू झाले मात्र ठेकेदारांचे लोखंडी खांब चोरीला गेले. या ठिकाणी कोणाकडूनही सहकार्य न मिळाल्याने ठेकदाराने उभे खांब काढून काम बंद केले व काढता पाय घेतला .
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर कामास सुरुवावत
नूतन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे काम त्वरीत सुरू करा अन्यथा संबधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली होती. यावर पालकमंत्र्यांनी त्वरीत कार्यवाहीचे आदेश दिले. या कामाला शुक्रवारपासून सुरवात करण्यात आली. विल्हाळे सबस्टेशनवरून वीज वाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक रवी सोनवणे, बबलू माळी, विष्णु खोले, मिलिंद मेढे, संजीव कोलते, इरफान पिंजारी, साजीद कुरेशी आदी उपास्थित होते.