वरणगावात एटीएसची 7 जणांवर कारवाई

0

वरणगाव। जिल्हाधिकार्‍यांनी भंगार खरेदी विक्री करणार्‍यांना तपशिलाची माहिती मागितली असता ती देण्यास नकार दिल्याने जळगाव येथील दहशतवादविरोधी पोलिस पथकाने वरणगाव येथे वरणगाव पोलिसांच्या सहकार्याने शहरातील सात जंणावर कारवाई केल्याची माहीती वरणगाव पोलिसांनी दिली आहे. भंगार खरेदी विक्री प्रकरणात व्यवहार झालेल्या मालासंदर्भात संपूर्ण विवरण असलेली मालाच्या खरेदी विक्रीबाबतची नियमानुसार कागदपत्रे ठेवणे भंगार विक्रेत्यांना बंधनकारक आहे. या नियमांचा भंग केल्याने ही कारवाई झाली.

नोटीसीलाही उत्तर नाही
भंगार खरेदी विक्री करणार्‍या सात लोकांनी त्यांच्या मालाचे खरेदी विक्री कागदपत्र नियमाप्रमाणे न ठेवल्याने उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेडकॉन्स्टेबल प्रविण पाटील, मनोहर शिंदे यांच्या पथकाने वरणगाव येथील केजीएन भंगारवाले मालक शेख आसिफ शेख हुसेन (वय 37, राहणार खिडकी मोहल्ला), गुड्डू काझी झियाहुद्दीन, शेख जामिर शेख इमाम उद्दीन, शेख शेरु शेख बशीर, शेख उल्लाउद्दीन शेख निजामोद्दीन, शेख हुसनोद्दीन शेख गयासउद्दीन व सायबर गुन्हे अंतर्गत आर्पीता कॉम्प्युटरचे मालक अतुल उत्तम महाजन सर्व राहणार वरणगाव यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या 1 जुलै ते 29 ऑगस्ट च्या आदेशाचे उल्लघन केल्यामुळे मनोहर रघुनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली आहे. याअगोदर संबंधितांना नोटीस देखील देण्यात आली होती. मात्र नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे या भंगार विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एटीएसचे सहाय्यक निरीक्षक इंगळे यांनी दिली.