वरणगावात कमळ फुलणार मात्र खडसे की महाजन गटाचे ?

0
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी हिवाळ्यात राजकीय आखाडा तापला आहे. भाजपा विरुद्ध भाजपा उमेदवार आखाड्यात उतरले असून पालिकेत कमळ फुलणार असलेतरी ते माजी मंत्री एकनाथराव खडसे वह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या गटाचे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांवर निवडणूक आली असतानाच पालिकेतील गटनेता सुनील काळे यांनी स्वतःलाच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासंदर्भात व्हीप जारी केल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक सहलीवर, मनोमिलन निष्फळ
 18 सदस्य असलेल्या वरणगाव पालिकेत नगराध्यक्ष पदाचा मुकूट मिळवण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील काळे व नाथाभाऊ यांचे खंदे समर्थक असलेल्या तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्या पत्नी रोहिणी सुधाकर जावळे यांनी सुरुवातीला नामांकन दाखल केले होते तर भाजपाचे नितीन माळी यांनी नामांकन दाखल केले आहेत. पालिकेत भाजपाचे आठ, राष्ट्रवादीचे पाच, अपक्ष चार तर सेनेचा एक सदस्य आहेत. भाजपाच्या एका गटाचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत तर सुनील काळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत नगरसेवकांना फोडण्यात यश मिळवल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजपाच्या दोन्ही नगरसेवकांनी सव्वा-सव्वा वर्ष पदावर रहावे याबाबतची चर्चा निष्फळ ठरल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच वाढला आहे.  सुनील काळे हे स्वतःलाच मतदान करण्यासंदर्भात पक्षाच्या नगरसेवकांना पोस्टाने व्हीप पाठवल्याने राजकीय गोटात मोठीच खळबळ उडाली आहे. काळे व जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.
भाजपाचा नगराध्यक्ष होणे महत्त्वाचे -खडसे
वरणगावातील प्रकारासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुनील काळे यांची आपल्याशी भेट झालेली नाही. गिरीश महाजनांचे नाव न घेता ते म्हणाले की, वरणगावात बाहेरच्या कोणत्या नेत्याने लक्ष घालावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. होणारा नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. वरणगाव हा आमदार संजय सावकारे यांचा मतदार संघ आहे. त्यांनी तेथे लक्ष घातले असल्याचे त्यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले.