वरणगाव- सिध्देश्वरनगर भागातील रहिवाशी योगेश शालिग्राम सुरळकर यांच्या हरी ओम प्रोव्हीजन किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी 14 हजार रुपये किमतीच्या सामानासह रोख पैसे व मोबाईल लांबविण्याची बुधवारी पहाटे उघडकीस आली. वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिध्देश्वर नगर भागातील पंचशील हाऊसिंग सोसायटीच्या जवळ योगेश सुरळकर (गणपती नगर, वरणगाव) यांचे हरी ओम प्रोव्हीजन दुकान आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. त्यांचे वडील शालिग्राम सुरळकर दुकानाच्या बाजूच्या रूममध्ये झोपले असताना बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी मागील खोलीच्या दरवाज्याच्या व जिन्याच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार रुपये रोख, आठ हजार रुपये किमतीचा दुकानातील सामान तसेच दोन हजार रुपयाचा मोबाईल असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला.