भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील मकरंद नगरात चोरट्यांनी घरातील गोदरेज कपाटामधील 12 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 50 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मकरंद नगर परीसरातील रवींद्र विश्वनाथ अवचारे यांचे दोन मजली घर असून खालच्या घरात कुटुंब झोपले असताना वरच्या मजल्यावरील खोलीत अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 12 हजारांची रोकड तसेच दुसर्या कंप्यात असलेले 26 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे कानातील टोंगल, गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, एक ग्रॅम वजनाचे धम्मचक्र, लहान मुलांची अंगठी व लहान मुलांच्या हातातील चांदीचे दोन जोडकडे सोन असा एकूण 50 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. श्वान पथकाने बोदवड रस्त्याकडे मार्ग दाखवीला. नरेंद्र रवींद्र अवचारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास हवालदार सुनील वाणी, गणेश शेळके करीत आहेत.