वरणगावात डासांचा प्रादुर्भाव

0

वरणगाव । नगर परिषद स्तरावरुन शहरातील नाल्यांची सफाई करणे गरजे आहे मात्र गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाकडून पाच नाल्यांसह भोगावती नदीचे साफसफाईचे काम करण्यात आले नाही त्यामुळे साचलेल्या डबक्यांमध्ये डासांचा प्रार्दुभाव झाला असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच डासांचा उपद्रव सतत राहील्यास डेंग्यु आजाराची लागण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याकरिता पालिकेने नागरिकांच्या आरोग्याकरीता धुळ फवारणी व तुंबलेल्या नाले व नदीचे डबक्याची सफाई करुन वाहते करावे अशी मागणी होत आहे.

डासांच्या प्रमाणात वाढ
शहराची वाढती लोकसंख्या पालिकेने लक्षात घेता शहरातील नैसर्गिक प्रवाहाने तयार झालेले नाले शहरातून गेले आहे आणि शहराच्या मधोमध असलेली भोगावती नदी यांची गेल्या कित्येक महिन्यापासून साफसफाई झाली नसल्याने डासाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकरिता पालिकेने शहरातून गेलेले नाले व नदीचे साफसफाईकरण व धुर फवारी करणे गरजेचे आहे.

अस्वच्छतेचा पाढा
त्याकडे ही पालीकेने लक्ष देवुन साफसफाईकरण करण्याची गरज आहे आणि बसस्थानक चौकातील दोन्ही नाल्यांमध्ये लहान-मोठे व्यावसाईक आपल्या दुकानांमधील घाण व केर कचरा टाकत असल्याने अस्वच्छतेचा पाढा निर्माण होत आहे त्याकडे ही पालीकेने लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. हिच परिस्थीती राहील्यास शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यु व अन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता वर्तवली
जात आहे.

खुल्या जागांवर काटेरी झाडे झुडपांचा त्रास वाढला
तसेच शहरातील एनए झालेल्या प्लॉट भागातील रिकामे असलेल्या प्लॉटमध्ये नैसर्गीकरित्या आलेला गवत, झाडे, झुडपे व काटेरी लहान झाडे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव निर्माण झालेला आहे.

रिक्त पदे भरावी
तसेच पालिकेत आरोग्य विभागाच्या दुष्टीकोनातून आरोग्य अधिकारी नसल्याने अशा घटना वारंवार घडत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पालिकेत अनेक पदे बर्‍याच कालावधीपासून रिक्त आहेत. तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असून त्यांच्याच अधिपत्याखाली वरणगाव नगर परिषद असून आमदार, खासदार यांनी नगररिषदेतील अतिमहत्वाची रिक्त त्वरीत भरुन वरणगावातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.