वरणगाव । सिध्देश्वरनगरातील सांडपाणी गेल्या रेल्वे पुलाखालील रस्त्यालगत साचून आहे. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत होता मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी स्व:त हातात कुदळ, पावडे घेऊन सांडपाण्याची विल्हेवाट करून रस्ता मोकळा केला. या भागातील नागरी समस्या सोडविण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सिध्देश्वरनगरातील रहिवाशांनी निवेदनात केला आहे.
रहदारीच्या रस्त्यात साचते पाणी
सदर वस्ती इंदिरा गांधी बेघर योजनेतून अस्तित्वात आली होती. कालांतराने या वस्तीचे सिध्देश्वर नगरात रूपांतर होवून गेल्या 35 ते 40 वर्षांपासून येथील लोकसंख्या पाच हजारांवर आहे. रहिवासी गोरगरीब, मजूर आहेत. रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेस शहराच्या अलिप्त असल्याने पालिका सोयी-सुविधा पुरविण्यास कमी पडत आहे. सिध्देश्वरनगर वस्ती उंच टेकडीवर आहे. येथे गटार नसल्याने सांडपाणी सरळ उतार असल्याने रेल्वे पुलाखालील रहदारीच्या रस्त्यात साचत आहे.
यांची होती उपस्थिती
नगरसेविका माला मेढे यांनी या संदर्भात पालिका प्रशासनास वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनदेखील दुर्लक्ष करण्यात आले. संतप्त झालेल्या नागरीकांनी स्व:त हातात कुदळी, फावडे घेऊन सांडपाणी इतरत्र वळवून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यात आला. बाळू माळी, उमेश झांबरे, यशवंत बढे, निलेश काळे, संतोष पाटील, भूषण माळी, कुंदन माळी, जितेंद्र मराठे, गणेश पाटील, विक्की माळी, पिंटू कोळी आदी रहिवासी उपस्थित होते.