वरणगाव- प्लॅस्टीक कॅरीबॅग खरेदी व विक्रीवर बंदी आल्यानंतर सर्व पालिकांच्या हद्दीत कारवाई झाली असलतरी वरणगावात मात्र कारवाईला ‘खो’ देण्यात आला होता. याबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने ही वृत्त प्रसिद्ध करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने व प्रभारीराज असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या मात्र नुकतीच मुख्यधिकारीपदी बबन तडवी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्लास्टीक बंदीची मोहीम शुकवारपासून सुरू केली. या मोहिमेत स्वतः मुख्याधिकारी सहभागी झाले असून त्यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे गणेश चाटे, श्रीधर जाधव, आरोग्य विभागाचे दीपक भंगाळे, राजु गायकवाड, संतोष वानखेडे, गौतम इंगळे व इतर कर्मचार्यांचा सहभाग आहे.
20 लोकांवर कारवाई
पालिकेच्या पथकाने भोगावती नदीपासून बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन रोडवरील किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्रेते आदी ठिकाणांवरुन प्रत्यक्ष पाहणी करीत प्लास्टीक पिशव्या बाळगणार्यांवर कारवाई करीत दंड वसुल केला. साधारणतः दिवसभरात 20 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईचे सुज्ञ नागरीकांमधून स्वागत होत असून कारवाईत सातत्य राखण्याची मागणी होत आहे.