वरणगाव । महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीकोनातून महसूल विभागांतर्गत सर्वच पालिकांची वसुलीचे आदेश पारित करण्यात आले असून त्या माध्यमातून वरणगाव पालिकेनेही सक्तीची थकीत वसुली मोहीम हाती घेतली आहे. मात्र नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत असून नगरसेवकांचे आपापल्या प्रभागासह मुख्य अधिकार्यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
मुलभूत सुविधांकडे मुख्याधिकार्याचे दुर्लक्ष
भुसावळ तालुक्यातील दुसर्या क्रमाकांची वरणगाव पालिका येत असून येथील वसुली दैनंदिन 70 ते 80 हजारपर्यंत असून शासनाच्या नियमानुसार वसुली सक्ती राबविण्यात आली असून नागरिकांना त्याचा नाहक पालिकास्तरावरून भुर्दंड सोसावा लागत असल्याचे बोलले जात आहे. तरी नागरीक वसुलीसंदर्भात सहकार्य करीत आहे. मात्र त्यांच्या मुलभूत सुविधांकडे मुख्याधिकार्याचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावरील भोगावती नदीपात्रापासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत व इतर प्रभागातील पथदिवे काही प्रमाणात बंद अवस्थेत आहे तरी काही भागातील पथदिवे सकाळी 9े वाजेपर्यंत सुरू असतांना आढळून येत आहे. शहरातील विविध प्रभागात सांडपाण्याचे नाले व गटारीची व्यवस्थीत साफसफाई नसल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच भोगावती नदी पात्रात सांडपाण्याचे प्रवाह असल्याने त्यामुळे नदीपात्र दुषीत होत आहे तसेच शहराच्या विविध प्रभागांमध्ये काही नागरीकांनी वर्दळीच्या ठिकाणी गाई म्हशी आदी गुरांचे शेणखताचे उकिरड्यांचे ढीग साचून ठेवले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगरात तत्कालीन ग्रामपंचायतच्या माध्यमातून काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार केले असून मात्र रस्त्यांच्या दुतर्फा गटारीचा विसर पडला आहे. या नगरात अर्धवट रस्ते पडून असल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. या ठिकाणी नकाशाप्रमाणे सर्वच रस्ते 9 मिटरचे असून प्रत्यक्षात मात्र 3 मीटरचे रस्ते दिसून येत आहे तर येथील एक रस्ता राजकीय मातब्बर पुढार्याच्या शेताशेजारी असल्याने रस्त्याचे बांधकाम ररवडले आहे तर नगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने महिला व पुरुषांची कुचंबणा होत आहे. तरी पालीकेने सक्तीच्या वसुली बरोबर नागरी सुविधांकडे पालीका मुख्याधिकार्यांनी व नगरसेवकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.