वरणगावात पुतण्याच्या लग्नाच्या दिवशी काकांचा मृत्यू

हळदीमुळे सकाळी लग्न, संध्याकाळी अंत्यसंस्कार : कुटुंबावर शोककळा

वरणगाव : पुतण्याच्या लग्नाच्या दिवशीच सकाळी मोठ्या काकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरणगावात घडली परंतु वधु-वरास हळद लागलेली असल्याने सकाळी लग्नसोहळा झाला तर संध्याकाळी काकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाचे वृत्त कळताच लग्न मंडपावर शोककळा पसरली. येथील माजी सरपंच सतीश चंदने यांच्या परीरवारात मंगळवारी सूरज चंदने याचा लग्न सोहळा होता परंतु पहाटे सहा वाजता सूरजचे मोठे काका ओमप्रकाश नवरंगमल चंदने (72) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाचा आनंद पसरलेल्या घरात क्षणात दु:खाचे सावट पसरले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
वधू-वराला हळद लागलेली असल्याने परंपरेने लग्न पुढेही ढकलले जावू शकत नव्हते. त्यामुळे दु:खाचा डोंगर निर्माण झालेला असताना चंदने कुटुंबीयांनी निर्णय घेत सकाळी साडेअकरा वाजता लग्नविधी पूर्ण केले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ओमप्रकाश चंदने यांच्यावर येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.