भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे शुक्रवारी रात्री तीन ठिकाणी धाडसी घरफोडी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वरणगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव येथील साईनगर लगत असलेल्या हनुमान नगरातील शंकर साळुंके व प्रदीप सोयंके यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून घरातील कपाटे, शोकेस, पेट्या लोखंडी टॉमीच्या सहाय्याने उघडून सोन्याचे दागिने तसेच पॉलिश केलेले दागिने तसेच लहान मुलांचा पैशांचा गल्लाही चोरट्यांनी लांबवली. एकूण तीनही घरातून सुमारे 75 हजारांचा ऐवज लांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दोन घर मालक शिक्षक असून ते दिवाळीनिमित्त गावाला गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. शहरातील रामपेठमधील भर वस्तीतील महावीर किराणा दुकानातही चोरी झाली असून गल्ल्यातील पैसे व सामान मिळून 25 हजारांचा ऐवज लंपास झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पीएउपनिरीक्ष के.आर.पठाण, हवालदार सुनील वाणी, मनोहर पाटील करीत आहे. दरम्यान, वरणगाव शहरात गेल्या महिन्याभराच्या अंतरात दोन खून व घरफोड्याचे सत्र सुरू झाले असताना नागरीकांमध्ये भीती पसरली असून शहरात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.