‘वाघूर’च्या बंधार्याप्रमाणे बांधकामाचीही लोकप्रतिनिधींनी चौकशी करण्याची मागणी
वरणगाव- भोगावती नदीवरील जुन्या सातमोरी पुलाशी संलग्न असलेल्या बंधारा दुरूस्ती व खोलीकरणाचे काम सुरू आहे मात्र बांधकामासाठी निकृष्ठ दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात येत आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात प्रशासनाला पुन्हा बंधारा दुरूस्तीेचे काम हाती घ्यावे लागणार असल्याने कामाला सुरुवात झाली असून वेळीच प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आमदार संजय सावकारे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी वाघूर नदीवर बंधार्याचे काम निकृष्ट होत असल्याने बंद पाडले होते त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी येथे येऊन कामाची चौकशी करावी, अशी सुज्ञ मागणी सुज्ञ नागरीकांमधून होत आहे.
निकृष्ट कामामुळे लाखोंचा खर्च व्यर्थ जाण्याची भीती
मृद व जलसंधारण विभाग, जळगांवच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत महामार्गावरील भोगावती नदीच्या जुन्या सातमोरी पुलाला संलग्न असलेल्या जुन्या बंधार्यांचे दुरुस्ती व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र दुरुस्तीचे बांधकामासाठी खडी, रेती, सिमेंटचा योग्य प्रमाणात वापर केला जात नसल्याचा आरोप आहे. हौदाच्या बांधकामासाठी जमिनीतील खोली केवळ दोन फूट करण्यात आली शिवाय आसारीचा वापरही कमी प्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे होेणारे बांधकाम पहिल्याच पुरामूळे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीचे खोलीकरण करतांना मध्यभागाच्या चारीतील माती नदीमध्ये टाकली जात आहे.परीणामी पावसाळ्यात काढलेली ही माती पुन्हा चारीत पुन्हा पडणार असून या दुरुस्तीचा व खोलीकरणाचा कोणताही उपयोग होणार नाही. यामुळे शासनाचा पाणी अडवा-पाणी जिरवा यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरणार आहे मात्र या कामाविषयी उपअभियंता सुर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करीत काम चांगल्या पध्दतीने सुरू असल्याचे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी चौकशी करण्याची मागणी
तालुक्यातील वाघूर धरणावर सुरू असलेल्या बंधार्यांच्या बांधकामाची आमदार संजय सावकारे व गटाच्या जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी पाहणी करून निकृष्ट दर्जाचे होत असलेले बांधकाम बंद करण्यात आले. त्याच पद्धत्तीने या लोकप्रतिनिधींनी वरणगाव जवळील होत असलेल्या बांधकामाची ही पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.