वरणगाव- शहरातील गट नंबर 869 मधील डॉ.आंबेडकर नगरात जुने समाज मंदिरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी सात जणांना नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असताना 4 एप्रिल 2019 रोजी जुन्या समाज मंदिरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा काढून झाकून ठेवला होता परंतु या जागेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अचानकपणे उभा करण्यात आला. या प्रकरणी वरणगाव पोलिसांशी कोणताही पत्रव्यवहार अथवा तोंडी किंवा लेखी कळविले नसल्याने नगरसेविका अरुणा इंगळे, शामराव इंगळे, राजेश इंगळे, आनंदा दहाड, संजय भैसे, नरेंद्र इंगळे, ज्ञानेश्वर गवळी व इतर समाज बांधवांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी खुलासा 24 तासाच्या आत सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिले आहेत.