वरणगावात मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग सुरूच

0

विषारी द्रव्य सेवनाने शनिवारी झाला दोन गायींचा मृत्यु

भुसावळ- वरणगाव शहरात गत काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून विष प्रयोग करून मुक्या प्राण्याचा जिव घेतला जात आहे.या प्रकाराने पशुपालकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अज्ञातांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.
वरणगाव शहरात गत काही दिवसांपासून उपद्रवीकडून अशांतता निर्माण प्रयत्न केला जात असून मुक्या प्राण्यावर विष प्रयोग करून त्यांचा जिव घेतला जात आहे.शहरात पाच दिवसापुर्वी पंधरा वराहवर विष प्रयोग करून त्यांचा जिव घेण्यात आला.या घटनेत वराह पालकाचे 45 हजार रूपयाचे नुकसान झाले.तर शनिवारी दोन गायींवर विष प्रयोग करण्यात आल्याने त्यांचा गावाच्या मुख्य मार्गावरील भोगावती नदीच्या पुलावर मृत्यु झाला.यामूळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पुलावर मृत झालेल्या गायींची नगरपालीकेच्या कर्मचार्‍यांनी विल्हेवाट लावली.शहरात गत काही दिवसापासुन अज्ञाताकडून मुक्या प्राण्यावर केला जाणारा विषप्रयोग संतापजनक असून यामूळे गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुर नागरीकांमधून निघत आहे.यामूळे पोलीस प्रशासनाने अशा उपद्रवीचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

पशुपालकांनी सावध राहण्याची आवश्यकता
शहरात गत दिवसापासून मुक्या पाळीव व मोकाट प्राण्यांवर विषप्रयोग करून त्यांचा जिव घेतला जात असल्याचा प्रकार निंदनीय आहे.यामूळे पशुपालकांनी आपल्या पाळीव पशुधनाचे नुकसान होवू नये यासाठी सावध भुमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.तर मुक्या प्राण्यांवर विष प्रयोग करणार्‍या उपद्रवींचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे.अन्यथा शहरात हा प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ओझरखेड्यातही पाळीव श्‍वानांचा घेतला बळी
तालुक्यातील ओझरखेडा येथील सुरेश कोळी यांच्या पाळीव व गावातील इतर तिन मोकाट श्‍वानावरही पंधरा दिवसापुर्वी विष प्रयोग करून ठार करण्यात आले आहे.या प्रकरणी सुरेश कोळी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.तसेच मृत श्‍वानाचे वरणगाव येथील पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केले होते.