वरणगावात मोकाट श्‍वानांच्या उपद्रवामुळे नागरीक झाले त्रस्त

0

ग्रामीण रुग्णालयात औषधांचा साठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप ः लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची गरज

भुसावळ- वरणगाव शहरात मोकाट गुरा-ढोरांसह श्वानांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून मंगळवारी सायंकाळी एका मोकाट श्वानाने प्रतिभानगर मधील एका तीन वर्षीय बालकास चावा घेवून गंभीररीत्या जख्मी केले. यामुळे नागरीक व शाळांमध्ये जाणार्‍या लहान विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देवून मोकाट गुरे व श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. वरणगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरे व श्वानांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शहरातील मोकाट गुरे थेट महामार्गावर आपला ठिय्या मांडत असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच मोकाट श्वानांचा नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे.

प्रतिभानगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
रात्री-अपरात्री येणार्‍या दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर धावून जाणे यामुळे वाहनधारकांचा वाहनांवरील ताबा सुटून त्यांना किरकोळ अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारे मंगळवारी प्रतिभानगर मधील चंद्रकांत तायडे यांचा मुलगा सार्थक ( वय- 3) घराजवळ खेळत असतांना घरालगतच एका श्वानाने त्याचावर हल्ला करीत त्याच्या पायाला जबर चावा घेतला. यामूळे त्याला प्रथम वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले मात्र रूग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्यान सार्थक याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकाराने प्रतिभानगर व परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट गूरे व श्वानांचा पालिका प्रशासनाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

रुग्णालयात अत्यल्प औषधसाठा
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात महामार्गावर घडत असलेल्या अपघातातील जखमींना उपचारार्थ दाखल केले जाते मात्र रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा व मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना उपचार करणे अवघड होते. यामुळे अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात येते. या प्रकाराने अनेकांना नाहकचा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पालकांमध्ये भीतीचे सावट
शहरातील लहान बालके सकाळी गंगाधर सांडु चौधरी माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, आदर्श शाळा अशा विविध शाळांमध्ये जातात मात्र शहरात असलेल्या मोकाट श्वानांच्या उपद्रवामुळे लहान विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक धोका मार्गावरील मच्छी मार्केट जवळ निर्माण झाला असून या भागात मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला असल्याने या भागात पालिका प्रशासनाने त्वरीत उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

अँन्टी रॅबीज व्हायरल इंजेक्श्ननचा तुटवडा
ग्रामीण रुग्णालयात श्वानाने चावा घेवून जख्मी केलेल्या रूग्णांना एआरव्ही (अँन्टी रॅबीज व्हायरल ) हे इंजेक्श्नन देणे अत्यावश्यक असते. या इंजेक्शनमुळे श्वानाच्या लाळमधून जखमेत निर्माण होणारा संसर्ग जंतूरोग पसरण्यास अटकाव होतो मात्र ग्रामीण रुग्णालयात या इंजेक्श्ननसह इतर महत्वपूर्ण औषधांचा सतत तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे.