भुसावळ- सहा दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वरणगाव शहरातील भंगाळेवाड्यातील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय युवकाने शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. योगेश सतीश भंगाळे (33) असे मयत युवकाचे नाव आहे. या युवकाने आत्महत्या का केली? याबाबत माहिती कळू शकली नाही. मयत योगेश हा भंगाळे वाड्यातील शेतकरी सतीष भंगाळे यांचा एकुलता एक मुलगा होता. सहा दिवसांपूर्वीच त्याचा साखरपूडा झाला होता. शुक्रवारी योगेशच्या लग्नाचा बस्ता असल्याने सकाळी आई-वडील भुसावळला कपडे घेण्यासाठी पुढे निघाले होते. काही वेळात योगेशही भुसावळ येणार होता मात्र घरी कुणी नसल्याने त्याने अचानक राहत्या घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. मयत योगेशचे लग्न 26 मे रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. वरणगाव पोलिसात चुलत भाऊ संतोष भंगाळे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील वाणी व नागेंद्र तायडे करीत आहेत.