वरणगाव:- गावातील झांबरे वाड्यातील दूध व्यावसायीक किशोर सुखदेव झांबरे (51) यांच्या कन्या पूजाचा विवाह आसोदा येथील रहिवाशी भुषण चौधरी यांच्याशी शुक्रवार, 20 रोजी जळगाव येथे होणार होता. घरात पाहुणे मंडळींचे आगमन होत असतानाच गुरुवारी सायंकाळी सर्व नातेवाईक जळगाव येथे जाण्याच्या तयारीत होते मात्र किशोर झांबरे यांना गुरूवारी दुपारी 12 वाजेला उलटी होवून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले असता उपचार सुरू असताना हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने अनेकांना नकळत अश्रू आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता शोकाकुल परीस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.