वरणगाव । नगरपरीषतर्फे केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानातील हगणदारी मुक्त गाव या योजनेमार्फत संपूर्ण गांव हगणदारी मुक्त केले आहे. आता याच योजनेचा एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वेगवेळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकामी कर्मचार्यांना प्रशिक्षण व सूचना देऊन अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
वरणगाव झाले हगणदरीमुक्त
वरणगाव सुमारे अडीच वर्षांपूर्वी नगरपरीषद अस्तित्वात आली. सोयी-सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न व नागरीकांनी तेव्हढीच उत्स्फूर्त दाद दिल्याने शहर हणगदरीमुक्त झाले आहे. या पुढचे पाऊल स्वच्छ शहर करायचे म्हणुन नगरपरीषदेच्या कर्मचार्यांना सहकार्य करून प्रत्येक नागरीकांने आपल्या घरातील ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवायचा आहे व घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी येणार्या कर्मचार्याला तो वेगवेगळा केलेला ओला व सुका कचरा द्यायचा आहे . व्यापार्यांनी सुद्धा घनकचरा अधिनियमानुसार आपल्या दुकानातील ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवणे बंधनकारक आहे. हॉटेल व्यावसायीकांना यापुढे ओला कचरा कुजवणे बंधनकारक करण्यात आले आहे तर वरणगाव शहरात मांस विक्रेत्यांना जागा असूनदेखील त्यांनी ठिक-ठिकाणी आपली मांस विक्रीचे दुकान थाटल्याने त्यांना आता एकाच ठिकाणी दुकान लावावे लागणार आहे त्यामुळे शहर स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे.
यांची होती उपस्थिती
या अभियानांतर्गत ओला व सुका कचर्याचे संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हगणदारी मुक्तता, माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदल, क्षमता बांधणी, अभिनव उपक्रम या पध्दती कर्मचार्यांना कामे करायची असून अशा पध्दतीने कामे केली जातात वा नाही याचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र व राज्याचे पथक येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व या अभियानाचे अधिकारी शाम खेडे यांनी दिली. नगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, माला मेढे, वाघ, मिलिंद मेढे, गंभीर कोळी, संजय माळी, सुधाकर मराठे, दीपक भंगांळे, सोनार व सफाई कर्मचारी उपस्थित होते.