वरणगाव उद्या भाजपा जिल्हाध्यक्षांचा सत्कार व कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

0

मंत्री महाजन गटातर्फे आयोजन ; पुन्हा भाजपात दिसून आली फूट

भुसावळ- भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांच्या सत्कारासह भाजपा कार्यकर्ता सन्मान मेळाव्याचे तालुक्यातील वरणगाव येथे रविवारी सायंकाळी सहा वाजता श्री छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे संकट मोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठरावासह भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नागरी सत्काराचा कार्यक्रम घेण्यासाठी प्रसंगी नियोजन केले जाणार आहे. दरम्यान, यावेळी भाजपा सदस्य नाव नोंदणी अभियानाचा शुभारंभ सुद्धा जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांच्याहस्ते होईल. वरणगावात भाजपातर्फे होणारा हा कार्यक्रम मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाला मानणार्‍या गटातर्फे होत असल्याने येथे पुन्हा भाजपातील उभी फूट दिसून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एक कार्यकर्ता एक पदाचा निर्णय
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती राहणार आहे. आगामी पक्ष संघटन व पुढील रणनीती तसेच ‘एक कार्यकर्ता एक पद’ यावर सुद्धा पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. कार्यकर्त्यानी उपस्थिती द्यावी, असे आवाहन वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, भाजपा शहर प्रमुख सुनील माळी, नगरसेविका माला मिलिंद मेंढे, नगरसेविका नसरीनबी साजीद कुरेशी, नगरसेविका मेहनाजबी इरफान पिंजारी, माजी सरपंच सुखलाल धनगर, हाजी अल्लाउद्दीन सेठ, संजयकुमार जैन (देडिया), अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शामराव धनगर, साजीद कुरेशी, ईरफानभाई पिंजारी यांनी केले आहे.