वरणगाव औद्योगिक विकासपासून दूरच, बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागेना

1

राजकीय पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेण्याची आववश्यता

भुसावळ (विजय वाघ)- तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून वरणगावची ओळख निर्माण झाली आहे. अस असलेतरी स्थानिक राजकीय पक्षाच्या इच्छाशक्तीअभावी वरणगाव शहर औद्योगिक विकासापासून दूरच असल्याने शहरात सुशिक्षीत बेरोजगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. परीणामी शहरवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अनेकांनी आपल्या पाल्यांना रोजगारांसाठी मोठ्या शहराकडे रवाना केले आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यानी आपल्या राजकीय बळाचा वापर करून शहरात औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राजकीय वजन वापरल्यास बेरोजगारी होईल दूर
वरणगाव शहराची आयुध निर्माणी शिवाजी नजीकच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रामूळे जिल्ह्यात चांगली ओळख निर्माण झाली आहे शिवाय आयुध निर्माणीतील अनेक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांंनी भविष्याचा विचार करून वरणगाव शहरात प्लॉट खरेदी करून रहिवास सुरू केला आहे. यामुळे शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे मात्र शहर आणि परीसरात राजकीय इच्छाशक्तीअभावी कुठल्याही प्रकारचा लहान-मोठा औद्योगिक प्रकल्प निर्माण झाला नाही. यामुळे शहरातील बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे.परीणामी पालकांनी आपल्या पाल्यांना रोजगारासाठी मोठ्या शहराकडे रवाना केले आहे. इतकेच नव्हेतर अनेक कुटुंबेही आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने मोठ्या शहराकडे स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शहराचा सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करणार्‍या पदाधिकार्‍यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करून शहरात लहान-मोठे उद्योग व्यवसायाचे प्रकल्प निर्माण करणार्‍या उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे यामुळे शहरातील अनेक सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल शिवाय शहराच्या विकासालाही हातभार लागण्यास मदत होईल.

वीट निर्मिती व्यवसाय जोरात
नजीकच्या हतनूर धरणातील गाळ आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून सहज उपलब्ध राखेमुळे शहरालगतच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात व्यावसायीकांनी वीट निर्मिती भट्ट्यांच्या व्यवसाय सुरू केला आहे मात्र या वीट भट्ट्यांवर स्थानिक मजुरांपेक्षा सर्वाधिक परजिल्ह्यातील मजुरांना रोजगारांची संधी उपलब्ध होत असते यामुळे सद्यस्थितीत विटांचे माहेर घर म्हणून शहराची ओळख होवू लागली आहे.

खासगी व्यापारी संकूले
शहरात बहुतांश भागात खाजगी व्यापारी संकुले निर्माण करण्यात आली आहेत मात्र ही खाजगी व्यापारी संकुलातील गाळयांची अवाजवी किंमत सुशिक्षीत बेरोजगारांच्या आवाक्याबाहेर होत असल्याने सुशिक्षीत बेरोजगार हवालदिल झाले आहेत यामुळे शहरातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने सुसज्ज असे व्यापारी संकूल निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या मंगल कार्यालयाचीही दुरवस्था
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात शहरातील बसस्थानकालगतच्या अयोध्यानगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सार्वजनिक मंगल कार्यालय उभारले आहे मात्र नगरपालिकेच्या देखभाली अभावी मंगल कार्यालयाची दुरवस्था झाली आहे परीणामी या मंगल कार्यालयात नागरीक कार्यक्रम घेण्यास अनुत्सुक असतात. नगरपालिका प्रशासनाने या जागेवर नियोजनबध्द व्यापारी संकुलाची निर्मिती केल्यास अनेक सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध होवू शकते.

केवळ सुडाचे राजकारण
शहराच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष न देता शहरात सुडाचे राजकारणाचा पेव फुटला आहे. परीणामी शहराच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि पालिकेतील लोकप्रतिनिधींनी सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.