वरणगाव। येथील एक वैद्यकीय अधिकारी कोणतीही सूचना देता सुटीवर, तर दुसरे बर्याच दिवसांपासून रजेवर आहेत. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून येथील आरोग्य सेवेचा खोळंबा झाला आहे. याविषयी आमदार संजय सावकारे यांनी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीला केराची टोपली दाखवली गेली. यानंतर वरणगाव पालिकेचे एक पथक जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटण्यास गेले असता दोन शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती झाली.
रुग्णालय डॉक्टरविना वार्यावर
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार असले तरी वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि रिक्त जागांचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे कधीकाळी आरोग्याच्या प्रश्नावर पूर्वीच्या सत्ताधार्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्या भाजप पदाधिकार्यांना आता सर्वत्र त्यांची सत्ता असूनदेखील शासन-प्रशासनदरबारी खेटे घालणे भाग पडत आहेत. कारण येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची चार पदे मंजूर असली तरी केवळ दोन जागा भरल्या होत्या. त्यापैकी एक डॉक्टर आठ महिन्यांपासून रजेवर आहे. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा वैयक्तिक अडचणींमुळे 20 जानेवारीपासून रजेवर आहेत. परिणामी अतिशय महत्वाचे रुग्णालय डॉक्टरांविना वार्यावर आहेत.
शवविच्छेदन होत नसल्यामुळे अडचणी
वैद्यकीय अधिकारी नसल्याने दैनंदिन रुग्ण तपासणी, अपघातातील गंभीर जखमींवर उपाय, वयाचे दाखले मिळणे कठीण झाले आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन होत नसल्याने अनेक अडचणी येतात. वैद्यकीय अधिकारी नियुक्तीद्वारे हा तिढा सुटावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी पालिका आरोग्य सभापती माला मेढे, उपनगराध्यक्ष शेक अखलाक, गटनेते सुनील काळे, नगरसेवक सुधाकर जावळे, बबलू माळी, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे मिलिंद मेढे आदींनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली. यानंतर दोन डॉक्टरांची नियुक्ती झाली.