रस्ता शोधताना वाहनधारकांची कसरत : लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी
वरणगाव- गेल्या अनेक महिन्यापासून वरणगावातून सिध्देश्वरनगरकडे जाणार्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने नागरीकांना व वाहनधारकांना रस्ता शोधण्यासाठी कसरत करावी लागते आहे. लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयापासून ते शहराचा वाढीव भाग असलेल्या सिध्देश्वर नगराकडे जाणार्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली होती. यावेळी येथील नागरीकांनी नवीन रस्ता बांधकाम करण्यासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनाही साकडे घातले आहे. पावसाळा सुरू असल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची बेफिकीरी
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सिध्देश्वर नगरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने पालिका खड्डयांमध्ये मुरूम टाकण्याचे काम करीत असलीतरी संबंधित विभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रभागामध्ये मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. सिध्देश्वर नगरात मुरूमाची खदान असल्याने येथूनच मुरूम भरलेले ट्रॅक्टर याच रस्त्याने जात असल्याने या रस्त्याचे बारा वाजले आहेत.