वरणगाव दंगलीतील गुन्हेगारांची गय नाही

0

दत्तात्रय परदेशी : वरणगावात शांतता समितीची बैठक

वरणगाव- किरकोळ कारणावरून शहरात भांडण होऊन जातींमध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविणांर्‍या समाजकंटकावर पोलीस कारवाई करण्यात हयगय केली जाणार नाही मात्र निरपराधांनी कोणत्याच गोष्टींची भीती मनात बाळगु नये त्यांनी त्यांचे दैनंदिन कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी येथे म्हणाले. रामपेठ भागातील आठवडे बाजारात दहा दिवसांपूर्वी वाहन हटवण्याच्या कारणातून झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर वरणगाव पोलिसांनी शहरात जातीय सलोखा व शातंता नांदण्यासाठी बैठक घेतली. याप्रसंगी परदेशी बोलत होते.

कोणताही धर्म देत नाही द्वेषाची शिकवण
माजी सरपंच सुकलाल धनगर यांनी कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही परंतु समाजातील काही समाजकंटक क्षुल्लक कारणावरून दोन धर्मात तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली तसेच मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष शे.अल्लाउद्दीन यांनी सर्वधर्म समभाव निर्माण होण्यासाठी शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

एकत्र राहिल्यास शहराचा विकास
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपले विचार मांडताना शहरात शांतता रहावी सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र राहिले तरच शहराचा विकास साधता येईल. घडलेला प्रकार दुदैवी आहे असे, प्रकार शहरात पुन्हा घडु नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यांचीही होती उपस्थिती
माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे, भाजपा शहराध्यक्ष इप्तेखार मिर्जा, के.बी.काझी, मिलिंद मेढे, उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्यासह शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.