वरणगाव नगरपरीषदेला सव्वा दोन कोटींचा निधी

0

विकासकामांना मिळणार चालना, शहराचा विकास हाच ध्यास -नगराध्यक्ष सुनील काळे

भुसावळ- वरणगाव नगरपरीषदेला केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लोकसंख्येवर आधारीत, जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थ्यान व नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत विविध विकास कामांसाठी सव्वा दोन कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील विविध कामाना चालना मिळणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. वरणगाव शहरातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसुफ व सहकारी नगरसेवक प्रयत्न करीत आहेत.

दोन कोटींच्या निधीने विकासकामांना चालना
शहरातील विविध कामांसाठी शासन दरबारी निधीसाठी पाठपुरावा सुरू असून या प्रयत्नांमुळे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लोकसंख्येवर आधारीत विविध कामे करण्यासाठी एक कोटी 72 लाख 43 हजार 176 रूपये, जिल्हा नियोजन समितीतंर्गत नगरोत्थ्यानसाठी 20 लाख, नागरी दलीत वस्ती विकास योजनेतंर्गत 20 लाख व अग्निशमन सेवा बळकटीकरणासाठी सहा लाख रूपये असा एकूण दोन कोटी 18 लाख 46 हजार रूपयांचा निधीचा समावेश आहे. या निधीतून शहरातील विविध कामांना चालना मिळणार असल्याने शहराच्या विकास कामांत भर पडणार आहे तसेच नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सौरभ जोशी व सहकारी नगरसेवक शहराच्या विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शहराच्या विकासकामांत पडेल भर
शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून शहरातील विकासकामांत भर पडणार आहे. यामध्ये वाढीव पाणीपुरवठा योजना, 14 व्या वित्त आयोगातून शहरातील सार्वजनिक पथदिव्यांचा वीज बिल भरणा, रस्ते, गटारी, स्वच्छ सर्व्हेक्षण, शौचालयाचा परीसर स्वच्छ करणे आदी विकास कामांना प्राधान्य दिले जाणार आहे तसेच शहरातील विकासकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरीषदेचे पदाधिकारी प्रयत्न करीत असून शहराचा विकासकामांच्या बाबतीत ध्यास घेतला आहे.

शहराच्या स्वच्छतेवर भर
वरणगाव शहराला स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार मिळाला आहे. यामुळे पालिका प्रशासनाने स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे मात्र पालिका प्रशासनाने विविध भागातील सार्वजनिक ठिकाणी कचरा संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या कचराकुड्यांची विघ्नसंतोषीकडून नासधूस केली जात आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

स्वार्थीपणा करणार नाही
शहराच्या विकास कामांसाठी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली असल्याने शहराच्या विकासकामासाठी कुठल्याही प्रकारचा स्वार्थीपणा करणार नाही. सर्वांना सोबत घेवून येत्या काही कालावधीत पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी मिळवला जाणार आहे. यामुळे शहराच्या विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.