नगरसेवक अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे 27 रोजी सुनावणी
भुसावळ (गणेश वाघ)- वरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटाची सरशी झाल्यानंतर गटनेता बदलण्याचे प्रकरण गेल्या आठ महिन्यांपासून चर्चेत आहे. भाजपातील कट्टर मात्र दोन्ही नेत्यांना श्रद्धास्थान मानणार्या नगरसेवकांच्या गटातर्फे एकमेकांना अपात्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सोमवार, 6 ऑगस्ट रोजी उभयतांच्या अपात्रतेवर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर निकाल देणार असल्याचे जिल्हावासीयांचे या आदेशाकडे लक्ष लागले होते मात्र नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गटनेता प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात नव्याने याचिका दाखल केल्याने खंडपीठाने 13 रोजी सुनावणीचे आदेश दिले असून तोपर्यंत जिल्हाधिकार्यांनी निकाल देऊ नये, असे निर्देश दिल्याने तूर्त दोन्ही गटातील नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी नगराध्यक्ष काळे यांच्या वकीलांनी खंडपीठाच्या आदेशाची प्रत जिल्हाधिकार्यांना दिली तर या प्रकरणी 13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांसह दोन्ही गटाला खंडपीठात आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे तर जिल्हाधिकार्यांकडे सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी आता 27 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली आहे.
दोन्ही गटातील नगरसेवकांना तूर्त दिलासा
नगराध्यक्ष काळे यांनी खंडपीठात यापूर्वीच खरा गटनेता कोण? या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नसून काळे यांनी खंडपीठात पुन्हा 1 ऑगस्ट रोजी नवीन याचिका (क्रमांक 8769/2018) अॅड.विलास पाटील यांच्या माध्यमातून दाखल केली. नियमाला अधीन न राहता जिल्हाधिकार्यांनी गटनेता बदलाची नोंद केली असून आधीचा विचार केला असता आपणच गटनेता असल्याने नितीन माळी यांची अनधिकृत म्हणून नोंद केली आहे त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी होवून निर्णय द्यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. या याचिकेची दखल घेत न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.सुनील के.कोतवाल यांच्या न्यायासनाने या याचिकेवर 13 रोजी जिल्हाधिकार्यांसह दोघा गटाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहे नेमके प्रकरण
वरणगाव नगरपरीरषद अस्तित्वात आल्यानंतर सुरूवातीची अडीच वर्ष नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांनी पदभार सांभाळला तर नंतरच्या अडीच वर्षांसाठी झालेली नगराध्यक्ष निवड प्रक्रिया चांगलीच गाजली. या पदासाठी गटनेता सुनील काळे हे दावेदार असताना त्यांना डावलले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर 24 नोव्हेंबर 2017 रोजी स्वतःलाच मतदान करण्यासंदर्भात भाजपा नगरसेवकांना व्हीप बजावला. मात्र व्हीप काढताना गटनेत्यांनी विश्वासात घेतले नाही, असे कारण देत भाजपच्या आठपैकी पाच नगरसेवकांनी गटनेता बदलण्याची कार्यवाही केली. तसेच गटनेतापदी नितीन माळी यांचे नाव नोंदवले. नंतर गटनेते माळी यांनी 27 नोव्हेंबर 2017 रोजी व्हीप काढत नगराध्यक्षपदासाठी रोहिणी जावळे व उपनगराध्यक्ष पदासाठी गणेश धनगर यांना पाठिंबा द्यावा, असा व्हीप माळी यांनी काढल्यानंतर वरणगाव पालिकेचा आखाडा चांगलाच रंगला. खडसेंच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेल्या शीतयुद्धात जामनेरहून मंत्री गिरीश महाजनांनी रसद पुरवत काळेंना पाठिंबा दिला. या राजकीय घडामोडीनंतर सुनील काळे यांना भाजपच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पाच, शिवसेेनेचा एक आणि अपक्ष दोन अशा 10 नगरसेवकांनी मतदान केल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाचा मुकूट मिळवला तर मंत्री खडसे गटातील नगरसेवकांची सपशेल हार झाली.
नगराध्यक्ष निवडीनंतर अपात्र प्रकरणाचे कवित्व कायम
नगराध्यक्षपदी काळे विराजमान झाल्यानंतर माजी मंत्री खडसे समर्थक गटनेता नितीन माळी यांनी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी कुरेशी यांनी व्हीप झुगारल्याने त्यांना अपात्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली. यानंतर मंत्री महाजन समर्थक सुनील काळे यांनीदेखील आपण गटनेता असताना आपल्या आदेशाने व्हीप काढल्यानंतर त्याचे पालन न केल्याने माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बढे, नगरसेवक विकीन भंगाळे व नितीन माळी यांना अपात्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती.
महाजन-खडसे गटातील नगरसेवकांना अखेर दिलासा
मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर तब्बल आठ महिने जिल्हाधिकार्यांच्या न्यायासनासमोर अपात्रता प्रकरणाची ‘तारीख पे तारीख’ सुनावली चालली तर सोममार, 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी या प्रकरणाचा अंतिम फैसला सुनावणार असतानाच व नेमके काय होणार याची धाकधूक असताना नगराध्यक्ष काळे यांनी खंडपीठात नव्याने याचिका दाखल केली आहे. याबाबत 13 रोजी सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकार्यांकडे न्यायासनासमोर 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सत्तेच्या या सारीपाठात नेमकी सरशी कुणाची होते व कोण अपात्र होतो? हे आजतरी सांगणे कठीण आहे मात्र तूर्त मंत्री महाजन व माजी मंत्री खडसे गटातील नगरसेवकांसह नगराध्यक्षांना तूर्त का असेना दिलासा मिळाला आहे हेदेखील तितकेच खरे !