वरणगाव पाणीपुरवठा योजनेसह भूमिगत गटार योजनेची महिनाभरात कामे मार्गी लावा

0

नगरविकास मंत्री रणजित पाटील यांचे बैठकीत आदेश ; नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ- वरणगाव नगरपरीषदेची 32 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना व संपूर्ण शहरात 70 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करा, असे आदेश नगरविकास मंत्री रणजित पाटील यांनी सहाय्यक आयुक्त एस.व्ही.पिंपळे व प्रधान सचिव यांना दिले. अधिवेशन झाल्यावर तत्काळ एका महिन्यांच्या बैठक घेण्याचेही त्यांनी सांगत वरणगाव नगरपरीषदेला भरीव निधी देण्याचे आश्‍वासन दिले. वरणगावातील विविध प्रश्‍नांबाबत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले होते तर महाजन यांनी नगरविकास मंत्र्यांना याबाबत पत्र देत समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या होत्या.

मंत्रालयात झाली बैठक
नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केलेल्या आठ मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. प्रसंगी भुसावळचे आमदार संजय सावकारे, आयुक्त, संचालक वरळी, प्रधान सचिव, नगरविकास आरोग्य संचालक पूजा सिंग, कार्यकारी अभियंता निकम, सार्वजनिक बांधकामचे आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, नहींचे आयुक्त शिंदे यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वरणगावकरांना मोठा दिलासा
रेल्वे स्टेशन ते बसस्थानक रस्त्याच्या कामाला तातडीने सुरवात करा तसेच वरणगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रामा सेंटरचा विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास मंत्री यांनी आरोग्य संचालक डॉ.पूजा सिंग यांना दिले. वरणगाव शहरातील भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी सहा कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवा, असे आदेशही कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांना नगरविकास मंत्र्यांनी दिले. तसेच वरणगाव नगरपरीषदेत महिला बचत गटांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान तत्काळ लागू करून महिला बचत गटांना योजनेचा लाभ देण्याचे आदेश नगरपरीषद संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त एस.व्ही.पिंपळे यांना देण्यात आले. वरणगाव नगरपरीषदेतील 100 टक्के कर्मचारी समायोजनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी नगरविकास मंत्र्याकडे तात्काळ पाठवावा, असे सांगून तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचे बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, बैठकीला वरणगावचे मुख्याधिकारी बबन तडवी, अभियंता भैय्यासाहेब, मिटिंग पाणी पुरवठा विभागाचे हर्षल रसाळ, सहाय्यक आयुक्त एस.व्ही पिंपळे, कार्यकारी अभियंता निकम, तुषार चिनावलकर, आरोग्य संचालक डॉ.पुजा सिंग उपस्थित होत्या.