वरणगाव पाणीपुरवठ्यावरील एक्सप्रेस फिडर झाले सुरू

0

नगराध्यक्ष सुनील काळेच्या पाठपुराव्याची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
: वरणगावातील कृत्रिम पाणी टंचाईची समस्या मार्गी

भुसावळ- वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेवर विजेची समस्या निर्माण होत होती. यामुळे शहरातील नागरीकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा योजनेवरील एक्सप्रेस फिडर सुरू करण्याची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेवून ठेकेदाराला तातडीने एक्सप्रेस फिडर सुरू करण्याची सुचना केली. त्यानुसार ठेकेदाराने तातडीने एक्सप्रेस फिडरवरील जोडणी केल्याने शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

पाठपुराव्यानंतर एक्स्प्रेस फिडरचे काम मार्गी
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वरणगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी 35 लाख रूपये मंजूर झाले होते मात्र योजनेवरील ठेकेदार पाणीपुरवठा योजनेवरील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठा एक्सप्रेस फिडरच्या कामात हलगर्जीपणा करीत असल्याने योजनेवरील अनियमित वीजपुरवठ्यामुळे शहरातील नागरीकांना कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता तसेच याबाबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घालून कामात हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. यामुळे पालकमंत्र्यांनी ठेकेदाराला त्वरीत एक्सप्रेस फिडरचे काम करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार ठेकेदाराने पालकमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेची दखल घेवून एक्सप्रेस फिडरचे काम पुर्ण केल्याने पाणीपुरवठा योजनेवरील एक्सप्रेस फिडरचे बुधवारी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

अधीक्षक अभियंत्याला दिले आदेश
पाणीपुरवठा योजनेवरील एक्सप्रेस फिडरच्या कामात स्वकीयांनीच राजकीय मोगरी लावण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक्सप्रेस फिडरच्या कामात हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना ठेकेदाराच्या चौकशीचे आदेश देत तत्काळ काम सुरू करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार दोन दिवसात ठेकेदाराने अपुर्णावस्थेत असलेले एक्सप्रेस फिडरचे काम पुर्ण केले. यामुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील तांत्रिक अडचणीचा मार्ग मोकळा झाल्याने कृत्रीम पाणीटंचाईची समस्येचा मार्ग मोकळा झाला आहे.

यांनी केले उद्घाटन
सिद्धेश्वर नगर भागातील पाणीपुरवठा योजनेवरील एक्सप्रेस फिडरचे काम पुर्णत्वास होताच बुधवारी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसुफ, नगरसेवक रवींद्र सोनवणे, राजेंद्र चौधरी, नगरसेविका माला मेढे, प्रतिभा चौधरी, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंद मेढे, इरफान पिंजारी, समाधान चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी सिद्धेश्वर नगर भागात रात्री-अपरात्री होणारा पाणीपुरवठा दिवसा होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न करणार
शहराचा वाढता विस्तार पाहता शहरात अजून एक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे. यामुळे शहरातील नागरीकांना शुद्ध व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याने यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.