प्रस्तावावर सही करण्यावरून जुंपली ; ठिय्या आंदोलनामुळे मुख्याधिकारी सभेला आलेच नाही
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या शनिवारी सकाळी झालेल्या विशेष सभेत आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यावर चांगलीच खडाजंगी झाल्याने दिवसभर या विषयाची चर्चा रंगली. सभेच्या सुरुवातीलाच कर्मचारी आकृतीबंधाचा प्रस्ताव आताच्या आता तत्काळ पाठवा या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनंत गढे यांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केल्याने प्रभारी मुख्याधिकारी सौरव जोशी सभेला न जाता आंदोलकांच्या सामोरे गेले. सभेत शहरातील घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरला सभागृहात मान्यता देण्यात आली. लवकरच शहरातील ओल्या व सुक्या कचर्याचे वर्गीकरण होणार आहे.
आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये खडाजंगी
शनिवारी सकाळी 11 वाजता होणार्या विशेष सभेपूर्वी माझी नगराध्यक्ष अरुणा इंगळे या नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या दालनात दाखल झाल्या. प्रभाग क्रमांक 14 मध्ये क्लब हॉलच्या नकाशावर सही करा, असा त्यांनी नगराध्यक्षांवर दबाव आणला तर नगराध्यक्षांनी सही करण्यास नकार दिल्याने प्रस्तावावर सही न केल्यास बैठक होवू देणार नाही, असेही इंगळे म्हणाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले.
घनकचरा निविदेला मंजुरी
कर्मचारी आकृती बंधावरून पालिकेत सुरू असलेल्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी आंदोलकांना सामोरे गेल्यानंतर नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात वरणगाव शहरात ओला आणि सुखा कचरा गोळा वर्गीकरण करून डेपोपर्यंत वाहनाने नेण्याचा डीआर मंजूर करण्यात आला. दोन कोटी 66 लाख 20 हजार 960 रुपयांच्या निविदेला मंजूरी देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्टार रेटिंग ओडीएफचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
यांची सभागृहात उपस्थिती
सभेला नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, नगरसेविका माला मेढे, मेहनाजबी पिंजारी, प्रतिभा चौधरी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, वैशाली देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, विष्णू खोले, नितीन माळी, गणेश धनगर, स्वीकृत नगरसेवक सुधाकर जावळे, डॉ.विनोद चौधरी यांच्यासह सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्षांचा आरोप निरर्थक -सुनील काळे
परस्त्री मातेसमान असून असभ्य भाषा वापरणे ही माझी व भाजपाचीदेखील संस्कृती नाही. माजी नगराध्यक्षांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. अरुणा इंगळे यांनी शनिवारच्या सभेत आताच्या आता प्रस्तावावर सही करण्यासाठी दबाव आणला. त्यांच्या प्रभागात 26 लाख रुपये खर्चातून रस्ता मंजूर केला असून 42 लाखांचे समाजमंदिराचे काम सुरू आहे त्यामुळे त्यांच्या प्रभागात कामे होत नाही, हा आरोप निरर्थक ठरतो.
नगराध्यक्षांकडून दादागिरी -अरुणा इंगळे
नगराध्यक्ष सुनील काळे हे माझ्याशी अत्यंत उद्धटपणे वागले व अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्या प्रभागात विकासकामे केली जात नाही. काळे हे भाजपाचे असल्याने त्यांची तक्रार आपण केलेली नाही. माझ्यामागे अमूक-अमूक नेत्यांची ताकद आहे, असे सांगून ते आपला आवाजही दाबतात, असे माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे म्हणाल्या.