वरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

0

22 विषयांना विरोध : नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी पडले एकाकी

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध कामांच्या निविदांना सभागृहाची मान्यता घेण्यात न आल्याने कार्यारंभ आदेश देण्यात आल्याच्या विषयावरून माजी मंत्री खडसे समर्थक गटातील नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्र या विषयांना विरोध दर्शवल्याने तब्बल 22 विषय वगळता अन्य विषयांना सभागृहात मंजुरी मिळाली. दरम्यान, नगरसेवकांच्या गोंधळातच सभा पार पडली तर एकीकडे विषयांना विरोध करणारे नगरसेवक तर दुसरीकडे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी एकाकी पडल्याचे दिसून आले.

यांची सभेला उपस्त्तिी
पालिकेच्या सभागृहात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेद्र चौधरी, रवी सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, सुधाकर जावळे, बबलू माळी, गणेश धनगर, विकीन भंगाळे, विनोद चौधरी, नगरसेविका अरुणा इंगळे आदी उपस्थित होत्या.

22 विषयांना नगरसेवकांचा विरोध
सभेच्या पटलावर 40 विषय ठेवण्यात आले होते परंतु काही विषयांमध्ये सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढण्यात आल्या व कार्यारंभ आदेश देण्यात आले तसेच टिप्पणीमध्ये मुख्याधिकारी यांनी या विषयाला मंजुरी द्यावी अशा प्रकारी टिपणी दिल्याने यावेळी सर्व नगरसेवक एका बाजूला तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी एका बाजूला पडल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही कॅमेरे नगरपरीषदेत बसवणे, इंटरकॉम मशीन व वायरिंग इन्स्टॉलेशन नगरपरीषद संकेतस्थळ तयार करणे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी साठी बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करणे, स्वच्छ सर्वेक्षण अभियाांतर्गत कापडी पिशव्या पुरवण्याबाबत नालेसफाई करणे, कंपोस्ट युनिट पुरवणे प्रिन्सेस स्टिकर पुरवणे, सुशोभीकरणासाठी छत्र्या, आरो, कुलर खरेदी करणे, जीपीएस सिस्टिम बसवणे, वरणगाव रेल्वे स्टेशन कॉलनीला पाणीपुरवठा करणे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत मैला प्रक्रिया केंद्र बांधण्याबाबत ई टॉयलेट खरेदी करणे, पथदिवे नियंत्रण करणे, पोलिस स्टेशनसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीला वॉटर एटीएम साठी जागा देणे, शहरात महिला व पुरुषांना फायबर मुतारी खरेदी करणे यासह इतर विषय नामंजूर करण्यात आले. यामध्ये काही विषयांच्या कामांच्या निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे परंतु सभागृहाची मंजुरी न घेतल्याने या कामांना सभागृहाने मंजुरी दिली नाही.

विकासकामांना विरोधाचा खेद -नगराध्यक्ष
शहरातील काही महत्त्वाची विका कामे याबाबत मंजुरीसाठी विषय ठेवण्यात आले होते परंतु सभागृहातील नगरसेवकांनी या विषयाला नामंजुरी दिल्याने विकासाला विरोध होत असल्याना खेद वाटतो, नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

नियमबाह्य कामाला विरोध -गटनेता
सभागृहाची मंजुरी घेऊन तांत्रिक मंजुरीनंतर निविदा प्रकाशित झाल्या पाहिजे परंतु मुख्याधिकारी यांनी विविध सभागृहाची मंजुरी न घेता निविदा काढल्या व कार्यारंभ आदेश दिल्याने सदरच्या विषयांना विरोध करून नामंजूर करण्यात आल्याचे राष्ट्रवादी गटनेता राजेंद्र चौधरी म्हणाले.