वरणगाव- पालिकेतील भाजपमधील गट नेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने दोन्ही गटांनी विषय समिती सदस्यांची निवड करून त्यांची नावे बंद लिफाफ्यात औरंगाबाद खंडपीठात पाठवण्याचे आदेश होते तर खंडपीठात 28 ऑगस्टला कामकाज अपेक्षित होते मात्र कागदपत्रे वेळेवर न पोहोचल्याने विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
याचिका सुनावणीला आलीच नाही
वरणगाव पालिकेतील बांधकाम, महिला व बालकल्याण, आरोग्य समिती निवडीला एक वर्ष पूर्ण झाले. यामुळे पुनश्च समिती सदस्यांची निवड करण्यासाठी 14 ऑगस्टला सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर पीठासीन अधिकारी होते मात्र सत्ताधारी भाजपमधील गटनेते पदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने कोणाचे सदस्य निवडले जातील याबाबत साशंकता होती. त्यातच नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही गटनेत्यांनी समिती सदस्यांची निवड करून त्यांची नावे बंद लिफाफ्यात 28 ऑगस्टच्या आत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर 28 ऑगस्टला खंडपीठात कार्यवाही होणार होती मात्र सदरचे पत्र वेळेत न पोहोचल्याने याचिका सुनावणीसाठी आली नाही. यामुळे समिती सदस्यांची निवड पुन्हा लांबणीवर पडली.