जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
वरणगाव ः नगरपरीषदेच्या आकृतिबंधामध्ये सर्व कर्मचार्यांचे समायोजन करण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली. वरणगाव नगरपरीषद कर्मचार्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पाठपुरावा करीत आहेत. पालिकेत एकूण 125 कर्मचारी आहे त्यापैकी 18 कर्मचार्यांचे आकृतीबंधात समायोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र कर्मचारी संघटनेला ही बाब मान्य नाही. या संदर्भात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी परीस्थिती लक्षात घेता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यांतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या मागणीबाबत साकडे घातले.
107 कर्मचारी ठरले अतिरीक्त
विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे कर्मचारी संघटनेचे शंकर झोपे, मुक्तार खान, विजय मराठे, अनिल चौधरी आदी मुख्यमंत्री यांच्या दालनात उपस्थित होते. वरणगाव नगरपरीषदेत 125 कर्मचारी सध्या कार्यरत असून शासकीय नवीन नियमानुसार आकृतीबंधात 18 कर्मचारी सेवेत बसविण्यात आले तर उर्वरीत 107 कर्मचारी अतिरिक्त ठरत आहे. नगरपरीषदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ लोटला गेला मात्र कर्मचार्यांना नगरपरीषदेच्या कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाही. वास्तविक सर्वच कर्मचारी आशेचा किरण बघून काम करीत आहे मात्र शासनाकडून 18 कर्मचारी आकृतीबंधात समाविष्ट होत असतील व मग 107 कर्मचार्यांचे काय? असा प्रश्न आहे.
वरणगाव परीषद माझी -मंत्री गिरीश महाजन
वरणगाव पालिकेतील कर्मचार्यांना न्याय मिळण्यासाठी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नगरपरीषद संचालनालय वरळी-मुंबईचे आयुक्त यांना भ्रमणध्वनी करून वरणगाव नगरपरीषद ही माझी नगरपरीषद अअसल्याचे सांगत 18 कर्मचारी आकृतीबंधात बसवण्यात आल्याचे सांगून 107 कर्मचार्यांवर अन्याय होत असल्याची बाब चुकीचे असल्याचे सांगत अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, असे सांगत वरणगाव नगपरीषदेच्या सर्व कर्मचार्यांना तत्काळ आकृतीबंधात समायोजन करून बसवावे, अशी सूचना केली. निवेदनाची प्रत आमदार संजय सावकारे यांनाही देण्यात आली आहे.