वरणगाव पालिकेत गटनेता बदलला, नितीन माळींना संधी

0

जिल्हाअधिकाऱ्यांकडे  नोंदणी : राष्ट्रवादी उमेदवाराच्या माघारीने निवडणुकीत रंगत

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कधी नव्हे ती इतकी चुरस निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठींना विचारात न घेता गटनेता सुनील काळे यांनी स्वतःच्याच नावाचा व्हीप जारी केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांची मोठी गोची निर्माण झाली होती तर रोहिणी जावळे यांना पदावर विराजमान करण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्यानंतर सोमवारी थेट काळेंना बाजूला करीत नितीन माळी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे भाजपाच्या पाच नगरसेवकांनी नोंदणी केल्याने राजकीय गोटात मोठीच खळबळ उडाली.

वरणगावात पेटला राजकीय आखाडा
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक व तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्या पत्नी रोहिणी जावळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले होते तर दुसरीकडे पालिकेतील गटनेते व खडसे यांचेच समर्थक सुनील काळे यांनी पक्षश्रेष्ठींना विचारात न घेता स्वतःच्या नावाचा व्हीप जारी केल्यानंतर भाजपाच्या राजकीय गोटात खळबळ उडाली होती. या निवडणुकीत जामनेर कनेक्शन अर्थात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घातल्याने बोलले जात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची ठरली आहे.

राष्ट्रवादीची निवडणुकीतून माघार
मंत्री महाजन यांचे खंदे समर्थक व भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांच्यासोबत पालिकेत येत चौधरी यांच्या माघारीबाबतचा अर्ज सादर केल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली. त्यामुळे सुनील काळे यांना उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व अपक्ष मदत करतील, असे राजकीय संकेत आहेत तर रोहिणी जावळे यांची पदावर वर्णी लागण्यासाठी थेट वरणगाव पालिकेतील गटनेताच बदलाच्या हालचाली सुरू असल्याने ही निवडणूक पालिकेची मात्र प्रतिष्ठा ‘आजी-माजी मंत्र्यांची’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक शशी संजीव कोलते यांना तटस्थ राहण्याबाबत व्हीप बजावल्याने 18 सदस्य असलेल्या पालिकेत सोमवारी रात्रीपर्यंत काय-काय राजकीय घडामोडी घडतात व मंगळवारी नगराध्यक्ष पदाचा मुकूट कोण मिळवतो? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.