जलसंपदा मंत्र्यांच्या पाठपुराव्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
भुसावळ– तालुक्यातील वरणगाव पालिकेचे उत्पन्नाचे श्रोत कमी असल्याने विशेष अनुदानातून भरवी निधीची मागणी नगराध्यक्ष काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती व याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख यांच्या उपस्थितीत बैठकही झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरणगाव पालिकेला भरीव निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्ती करीत वरणगाव पालिकेला विशेष अनुदान म्हणून तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याबाबत 26 मार्च रोजी नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी निधी मंजुरीचे आदेशही काढले आहेत.
वरणगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलणार
तीन कोटींच्या मंजूर निधीतून वरणगाव शहरात लवकरच रस्त्यांची कामे होणार असून गटारी व मूलभूत सुविधांची कामे करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
नगराध्यक्षांनी मानले आमदार सावकारेंचे आभार
वरणगाव पालिकेला निधी मिळाल्याने नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, मुख्यधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता डीगंबर वाघ, नगरसेविका माला मेढे, राजेंद्र चौधरी, नसरीनबी साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी संजीव कोलते, प्रतिभा चौधरी, विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी यांनीही पदाधिकार्यांचे तीन कोटींचा निधी मिळवून दिल्याने अभिनंदन केले आहे.