वरणगाव बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाला सुरुवात करा

0

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ; नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीला यश

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरातील बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्ता कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या हस्ते व खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थित झाल्यानंतर रस्ता 24 मीटरचा की 18 मीटरचा याचा वाद सुरू झाला होता. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी, उपअभियंता एस.यु.कुरेशी, नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रतापराव पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ठाकूर यांच्यात बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचा सूचना दिल्या. वर्षभरापूर्वी दुभाजक, पोलसाठी 35 लाख व 56 लाख रुपये रस्ता कामासाठी निधी मंजूर झाल्याने कामाला सुरुवात न केल्यास नगरपरीषद जबाबदार राहील, असे जिल्हाधिकार्‍यांनी बजावले.

अतिक्रमण हटवून कामाला सुरुवात करा
रस्ता कामासाठी 91 लाखांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असतानाच गावाच्या विकासासाठी मिळालेला निधी परत जाता कामा नये ही बाब नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी जिल्हा भूमिअधिकारी यांना प्राधान्याने वरणगाव येथे जावून रस्त्याचे मोजमाप करून खुणा गाडाव्यात, अश्या कडक सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तत्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासह ज्यांन अतिक्रमण केले असेल त्यांचे अतिक्रमण तत्काळ काढण्याचे आदेश दिले तसेच अतिक्रमण काढताना अडथळे आणणार्‍यांवर तत्काळ कार्यवाही करून त्यांच्या नावाची लिस्ट तयार करून माझ्याकडे द्या, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी व उपअभियंता एस.यू.कुरेशी यांना बजावले.