वरणगाव येथील प्रतिभानगर भागातील पुलाच्या कामास सुरवात

0

वरणगाव । येथील प्रतिभानगर व मुख्य रस्त्याला जोडणार्‍या पुलाचे काम रेती अभावी बंद पडले होते. या पुलाचे काम पुन्हा सुरू झाले असुन प्रगतीपथावर असल्याने येथील रहिवाशामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ऐन पावसाळ्यापुर्वी हे काम पुर्ण झाल्यास अडचणी सुटणार आहेत. शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत प्रतिभानगर वसाहत आहे. या वसाहतीच्या बाजुला बाजार समीती व महामार्ग आहे. या रस्त्याने मुक्ताईनगर, आयुध निर्माणीकडे जाणारे नागरीकांची रेलचेल असते.

धोका वाढल्यामुळे नवीन पुलाची निर्मिती
या वसाहतीला व मुख्य रस्ता यामधे नाला असल्याने या ठिकाणी जवळपास पन्नास फुट उंचीचा पुल बांधण्यात आला होता. मात्र काही दिवसापासून हा पुल हलू लागला होता. तसेच जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याने हा पुल तयार करण्याचे काम पालीकेने हाती घेतले होते. दोन ते अडीच महिन्यांपुर्वी पुल जेसीबीने तोडण्यात आला होता. यावेळी कठोरा येथुन जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी जलवाहीनी देखील तुटली होती. यावेळी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

नागरीकांची अडचण सुटणार 
पुल तोडल्यानंतर रेती बंद झाल्याने हे काम बंद पडले होते. यामुळे प्रतिभानगरमधील नागरीकांना बाजार समितीमार्गे अथवा भोगावती नदीजवळून फेर्‍याने मुख्यरस्त्यावर यावे लागत होते. यामुळे सदरच्या पुलाचे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणी येथील नागरीकांची होती. मात्र रेती नसल्याने काम सुरू करता येत नव्हते. त्यात पावसाळ्यादेखील अडचणी निर्माण झाल्या असत्या. याकरीता सदरच्या ठेकेदाराने सदरच्या पुलाचे काम सुरू केल्याने नागरीकांची अडचण सुटणार आहे. सदरच्या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरीकांना फेर्‍याने जावे लागते. या कामाला प्राधान्य देवून पावसाळ्या पुर्वी काम पुर्ण केल्यास प्रतिभानगर मधील नागरीकांची अडचण सुटेल.