वरणगाव रेल्वे स्थानकावर सुविधांंचा अभाव

0

प्रवाशांना ऊन-पावसातच उभे राहून करावी लागते रेल्वेची प्रतीक्षा

भुसावळ- वरणगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या हितासाठी असलेल्या सुविधांची वानवा असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात उघड्यावर उभे राहूनच रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्थानकावर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. भुसावळ जंक्शन स्थानकापासून जवळच असलेल्या वरणगाव रेल्वे स्थानकावरून वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर व परीसरातील ग्रामीण भागातील विदर्भाकडे जाणार्‍या व येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधन गृह, बसण्यासाठी बाके आणि प्रवाशांची ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. यामध्ये लहान बालकांचाही समावेश असतो तसेच प्रसाधन गृहाअभावी अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

पादचारी पुलाचा प्रश्‍न प्रलंबित
वरणगाव शहराचे अविभाज्य अंग असलेल्या सिद्धेश्‍वर नगर व विस्तारीत भागात किमान पाच हजार नागरीकांची वसाहत निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील सर्व नागरीकांना व विद्यार्थ्यांना स्थानकावरील रेल्वे रूळ ओलांडून शहरात येणे-जाणे करावे लागते. वेळप्रसंगी रेल्वे रूळ ओलांडणार्‍या नागरीकांना रेल्वे सुरक्षा बलाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. यासाठी या भागातील नागरीकांनी रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार हरीभाऊ जावळे यांनीही पाठपुरावा केला होता मात्र घोडे अडले कुठे ? असा प्रश्‍न या भागातील नागरीकांना पडला असून खासदार रक्षा खडसे यांनी पुढाकार घेवून या भागातील नागरीकांची समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

फुकट्या प्रवाशांना रान मोकळे
येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशी गाडी येते वेळी तिकीट तपासणीस हजर राहत नसल्याने अनेक फुकटे प्रवाशांना रान मोकळे झाले आहे. तसेच अवैधरीत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही या स्थानकावर कुठल्याही प्रकारची कारवाई होेत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने या स्थानकाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

प्लॅटफार्मची दुरवस्था
अवघ्या काही वर्षापूर्वी येथील प्लॅटफार्मची लांबी वाढवून प्लॅटफार्मवर टाईल्स बसवण्यात आल्या होत्या मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी प्लॅटफार्मवरील टाईल्सची दुरवस्था झाली आहे. या प्रकाराकडेही रेल्वे प्रशासनाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेवून स्थानकावर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.