वरणगाव शहराजवळील सातमोरी पुलाजवळ अपघात :ट्रकवर बस धडकल्याने 45 प्रवासी जखमी

0

भुसावळ आगारातर्फे जखमींना तातडीची मदत ; वरणगाव पोलिसात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ- ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागावून आलेली बस धडकून झालेल्या अपघातात विद्यार्थिनींसह प्रवासी मिळून 45 प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील महामार्गावरील सातमोरी पुलाजवळ घडला. यापैकी आठ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलवण्यात आले आहे. जुनोना-बेलखेडा-ओझरखेडा-तळवेल इथून 60 प्रवासी घेऊन जुनोना-भुसावळ बस (एम.एच.14 बी.टी.1659) सातमोरी पुलाजवळ आली असता पुढे चालणार्‍या अज्ञात ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने बस चालक नितीन अशोक बाऊस्कर (42, रा.साकरी) तातडीने ब्रेक मारल्याने बस घसरून ट्रकवर धडकली तर बसमधील प्रवासी पुढच्या बाजूला फेकले गेल्याने 45 प्रवासी जखमी झाले .

अपघातानंतर अनेकांची धावाधाव
अपघाताची माहिती मिळताच जवळच असलेले शिवा भोई , नगरसेवक बबलू माळी, मिलिंद मेढे, नकुल पाटील, रवी सुतार, राजू भोई यांनी तत्काळ जखमींना बसमधून बाहेर काढत मिळेल त्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात हलवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी क्षीतीजा हेडवे यांनी उपचार केले. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक आदींनी धाव घेत जखमींची विचारपूस केली.

आठ जणांची प्रकृती गंभीर
अपघातात आकाश लहानसिंग राजपूत (20), सुरेश देवराम पाटील (50), कल्पना पाटील (28), गणेश पाटील , सुरेश पाटील (50, ओझरखेडा) व इतर चार रुग्णांना जबर मार बसल्याने जळगाव सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ आगार प्रमुख हरीश भोई त्यांचे सहकारी गजानन देवरे व इतर कर्मचार्‍यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली व काही प्रवाशांना तत्काळ रोख स्वरूपात मदत केली तसेच विभागीय वाहतूक अधीक्षक प्रल्हाद घुले , विभागीय वाहतूक अधीक्षक दिलीप बंजारा यांनी देखील भेट देऊन जखमींची विचारपूस केली. वरणगाव पोलिस स्टेशनला एस.टी.चालकाविरूध्द गुन्हा नोंद दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक् निलेश वाघ करीत आहेत.